सांगली ः जिल्हा परिषद, विश्व योगदर्शन केंद्र, सांगली आणि चितळे डेअरी यांच्यावतीने शनिवार, दि. 21 जूनरोजी जिल्ह्यातील साडेपाच हजार केंद्रांवर वारकरी तालावर ‘भक्तियोग’ साजरा केला जाईल. जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा अधिक लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे. भविष्यात भक्तियोग जिल्ह्याचे वैभव म्हणून पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले.
सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एकाचवेळी व एकाच तालावर योगासने केली जाणार आहेत. धोडमिसे म्हणाल्या, शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी योगास आध्यात्मिक वारकरी संप्रदायाची भक्तिमय जोड देऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, औद्योगिक व व्यापारी केंद्रे, अशा विविध ठिकाणी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पोशाखात (पांढरा कुर्ता, पायजमा, नऊवारी साडी किंवा पांढरा पंजाबी ड्रेस) एकाच तालावर योगासने केली जाणार आहेत.
सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचे मुख्य केंद्र असणार आहे. येथून जिल्ह्यातील सर्व केंद्रे आभासी पद्धतीने जोडली जाणार आहेत. शनिवार, दि. 21 जूनरोजी सकाळी 8 ते 8.45 या वेळेत जागतिक योग दिन, योगिनी स्मार्त एकादशी व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्यासाठी ‘भक्तियोग’ उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी विश्वयोग दर्शन केंद्राचे बाळकृष्ण चिटणीस, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, उपस्थित होते.
भक्तियोग उपक्रमात जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्याबाहेरील, परराज्यातील लोकांना यु-ट्युबच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. भक्तियोग ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमात वैयक्तिक सहभागाबद्दलचे फोटो अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहितीही सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी दिली.