सांगली : प्रतिकूल हवामानामुळे गेल्यावर्षी द्राक्षाचे उत्पादन कमी झाले. परिणामी बेदाणा उत्पादनही 50 हजार टनांनी घटले, त्यामुळे इतिहासात यंदा पहिल्यांदाच बेदाण्याला प्रतिकिलोला तीनशे ते साडेचारशे रुपये असा चांगला दर मिळत आहे. यंदाही ऐन उन्हाळ्यातील मे मध्ये पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे द्राक्षाची काडी परिपक्व झालेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही द्राक्षाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. परिणामी, पुढील दीड-दोन वर्षे बेदाण्याचे दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकाराकडून व्यक्तहोत आहे.
देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात होते. विशेषतः सांगली, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये उत्पादन होते. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र असून या भागातील शेतकरी द्राक्ष मार्केटिंगवर अधिक भर देतात. सांगली व परिसरातील सोलापूर, सातारा, विजापूर जिल्ह्यांतील शेतकरी मात्र मार्केटिंगबरोबरच बेदाणा उत्पादन मोठ्या प्रमाणात करतात. राज्यात गेल्या वर्षी जोरदार व सातत्याने पाऊस झाला. प्रतिकूल हवामानामुळे अनेकांच्या द्राक्षबागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटले. अनेक शेतकर्यांनी द्राक्षाला चांगला दर असल्याने बेदाणा करण्याऐवजी बाजारपेठेत द्राक्षाची विक्री केली. परिणामी यंदा बेदाण्याचे उत्पादन घटले.
बेदाण्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन काही व्यापार्यांनी नेपाळमार्गे तस्करी होत चिनी बेदाणा उत्तर भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बेदाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचे कारण पुढे करीत काही व्यापार्यांनी बेदाणा दर पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शेतकरी, द्राक्ष बागायतदार संघाने यांनी ही बाब चव्हाट्यावर आणली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या चार महिन्यांत रक्षाबंधन, श्रावण, गणपती, गोकुळाष्टमी, दसरा, दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे या सणांच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
चीनमधील बेदाणा आयातीचे कारण पसरवून दर पाडण्याचे षड्यंत्र काही व्यापार्यांनी केल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या अफवांना बळी न पडता शेतकर्यांनी टप्प्याटप्प्यांनी बेदाणा विक्री करावा घाई-घाईत विक्री करू नका, असे आवाहन केले आहे.
सांगलीसह नाशिक भागातून परदेशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. बेदाण्याची निर्यात फारशी होत नाही. कमी गुणवत्तेचा बेदाणा बेकरी उत्पादनात वापरण्यासाठी आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. बाहेरील देशाच्या बेदाण्याच्या दराच्या तुलनेत राज्यात आपल्याकडे तयार होणार्या बेदाण्याचा उत्पादन खर्च जास्त आहे.
द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याने यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. पुढील दीड-दोन वर्षे अशीच स्थिती राहणार आहे. तस्करी होऊन भारतात आलेल्या बेदाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकर्यांनी घाबरून बेदाणा विक्री करू नये. टप्प्याटप्प्याने बेदाण्याची विक्री करावी. तस्करी करून बेदाणा आणलेल्या व्यापार्यांवर सरकारने कडक कारवाई करावी.- मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली