बावची जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण (खुला) झाल्याने येथील राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत आरक्षित राहिलेला हा मतदारसंघ यावेळी खुला झाल्याने इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि महायुती (भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व रयत क्रांती संघटना) यांच्यात जोरदार लढत होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
हा मतदारसंघ आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र बदललेली राजकीय समीकरणे, गटबाजी आणि महायुतीचे एकत्रित आव्हान यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. बावची जिल्हा परिषद मतदारसंघात बावची, पोखर्णी, नागाव, ढवळी, गोटखिंडी, येडेनिपाणी, मालेवाडी या सात गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातील बावची व गोटखिंडी पंचायत समिती गण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी राखीव झाले आहेत.
बावची गण : बावची, पोखर्णी, नागाव, ढवळी गोटखिंडी गण : गोटखिंडी, येडेनिपाणी, मालेवाडी. महिला आरक्षणामुळे दोन्ही आघाड्यांना आता महिला उमेदवारांसाठी चाचपणी करावी लागत असून, त्यामुळे अंतर्गत राजकारणाला वेग आला आहे. सन 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण होते. राष्ट्रवादीच्या राजश्री एटम यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय मिळवला होता. पंचायत समितीवर काँग्रेसचे आनंदराव पाटील व हुतात्मा गटाचे आशिष काळे निवडून आले होते. त्या निवडणुकीत बावची व येडेनिपाणी गावांनी राष्ट्रवादीला निर्णायक मताधिक्य दिले होते, तर पोखर्णी, नागाव, मालेवाडी गावांत विरोधकांची ताकद दिसून आली होती. यंदा मतदारसंघ रचनेत बदल होऊन भडकंबेऐवजी ढवळी गावाचा समावेश झाल्याने समीकरणे पुन्हा बदलली आहेत.
महायुतीची एकजूट, गड सर करण्याची तयारी
दुसरीकडे महायुतीने राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गौरव नायकवडी, रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत यांचे कार्यकर्ते गावोगावी सक्रिय झाले आहेत. हुतात्मा उद्योग समूहाची ताकद या मतदारसंघात निर्णायक मानली जात असून, तिचा फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बावची जिल्हा परिषद मतदारसंघासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) गटातील इच्छुक उमेदवार : बावचीमधून लक्ष्मी-पार्वती उद्योग समूहाचे संस्थापक काकासाहेब कोकाटे-पाटील, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच वैभव रकटे व सारंग भोसले, गोटखिंडीमधून माजी सरपंच धैर्यशील थोरात व के. डी. पाटील, येडेनिपाणीमधून माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, माजी सरपंच डॉ. सचिन पाटील व मकरंद पाटील.
महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांचे नाव आघाडीवर आहे. दोन्ही पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी प्रमुख नेत्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मतदारसंख्येच्यादृष्टीने बावची, गोटखिंडी व येडेनिपाणी ही गावे निर्णायक ठरणार आहेत.
या गावामध्ये नेहमीच अटीतटीचा सामना पाहायला मिळतो. यावेळीही या गावात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. बावची जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाल्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला गड राखण्यासाठी सर्व गट एकत्र ठेवावे लागणार असून, महायुतीला सर्व घटकपक्षांची एकजूट टिकवून राष्ट्रवादीच्या नाराज घटकांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद की महायुतीचे संयुक्त आव्हान यावरच बावची गटाचा निकाल ठरणार असून, यंदाची निवडणूक सांगली जिल्ह्यातील सर्वात चुरशीच्या लढतींपैकी एक ठरणार हे निश्चित आहे.