जत : गुजरातमधील गिरनार येथे देवदर्शनासाठी जात असताना बडोदा येथे मोटारीस झालेल्या अपघातात जत तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. राहुल गुंडा माने (वय 37, मूळ रा. विठ्ठलनगर जत, सध्या रा. पुणे) व सागर बाबुराव मदने (36, मूळ रा. कंठी, ता. जत, सध्या रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात शनिवार, दि. 25 ऑक्टोबररोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात संग्राम शाहू भोसले (37, मूळ रा. जत, सध्या रा. पुणे) व आणखी एक, असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बडोदा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील राहुल माने, सागर मदने, संग्राम भोसले व अन्य एक मित्र असे सर्वजण पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. शुक्रवारी चौघेही गुजरातमधील मोटारीतून गिरनार येथे देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार बडोदा येथे पोहोचली असता, पाठीमागून वेगाने आलेल्या मालवाहू ट्रकने त्यांच्या मोटारीस मागून जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल माने व सागर मदने यांचा जागीच मृत्यू झाला, तर संग्राम भोसले व त्यांचा मित्र (नाव समजू शकले नाही) हे दोघे जखमी झाले.
गुजरात पोलिस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दाखल करून घटनास्थळी पंचनामा केला. अपघाताची माहिती मिळताच मृतांचे व जखमींचे नातेवाईक व मित्र बडोद्याकडे रवाना झाले.