सांगली : बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने (युएफबीयू) मंगळवार, 27 जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबर शनिवारी, रविवार सुट्टी असल्यामुळे आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आता सलग चार दिवसा बँका बंद राहणार आहेत.
बँक संपामध्ये देशभरातील सुमारे 8 लाख बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. युएफबीयू मध्ये बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या 9 प्रमुख संघटनांचा समावेश असून, सार्वजनिक, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बँकिंग क्षेत्रात आठवड्याला 5 कामकाजाचे दिवस लागू करावेत तसेच सध्या सुट्टी असलेल्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त उर्वरित सर्व शनिवार सुट्टी जाहीर करावी, ही या संपामागील प्रमुख मागणी आहे.
आरबीएल, एलआयसी तसेच केंद्र व राज्य शासन कार्यालयांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. शेअर बाजार, मनी मार्केट व परकीय चलन व्यवहार शनिवार-रविवार बंद असतात, असे असतानाही केवळ बँक कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याने हा संप करण्यात येत असून, संपामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत जनतेने समजून घ्यावे व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.