बांग्लादेशी नागरिकाला सांगलीत अटक 
सांगली

बांग्लादेशी नागरिकाला सांगलीत अटक

शहर पोलिसांची कारवाई : सिव्हिल रस्त्यावर लॉजमध्ये मुक्काम; बनावट आधार कार्ड जप्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करणार्‍या एका बांग्लादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे अमीर शेख या नावाने तो शहरातील एका लॉजवर राहत होता. त्याचे मूळ नाव एम. डी. अमीर हुसेन (वय 62, रा. उत्तर आबादोर, मोहम्मदपूर, ढाका, बांग्लादेश) असे आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह योगेश सदामते, रवी कोरे, प्रदीप सावंत, संदीप पाटील यांचे पथक गस्तीवर होते. रविवारी सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना मिळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव अमीर शेख असून दिल्लीतील रहिवासी असल्याचे सांगितले. आपले आधार कार्डही दाखवले. त्यावर एबीसी नजदीक आंबेडकर चौक, मुनरीका गाव, जेएनयू, दक्षिण-पश्चिम दिल्ली, असा पत्ता होता. परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने आपण बांग्लादेशातील ढाक्का येथील असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीररित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय त्याने भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक, फोर्जरीसह कलम 3 (अ), 6 (अ), पारपत्र अधिनियम (भारतामध्ये प्रवेश) 1950, कलम 14अ (ब), परकीय नागरिक आदेश 1948 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे.

कोलकात्ता, पुणेमार्गे सांगलीत

बांग्लादेशी नागरिक अमीर हुसेन हा त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून 13 मार्चरोजी विमानाने कोलकात्ता येथे आला. तेथून तो पुण्यात आला. शिवाजीनगर बस स्थानकातून तो सांगलीस आला. सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील विशाल लॉज येथे तो राहत होता. त्याच्या मोबाईलमध्ये बंगाली भाषेचा वापर व 880 आयएसडी कोड असलेले मोबाईल व लँड लाईन नंबर पोलिसांना आढळून आले आहेत.

राजकीय पक्षाशी संबंध

घुसखोर अमीर हुसेन हा बांग्लादेशातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थैर्यामुळे तो घुसखोरी करून भारतात आला आहे. सांगलीत तो एका लॉजवर मुक्कामास होता. पण रात्रीच्या वेळी तो शहरात का फिरत होता, यामागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास शहर पोलिस करीत असल्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT