सांगली : बंगळुरू-वाराणसी-गोरखपूर व म्हैसूर-भगतकीकोठी (जोधपूर) या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर झाला आहे. सांगली जिल्ह्यातून अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, माऊ (बौद्ध गया), गोरखपूर व राजस्थान येथे आबू रोड, फालना (श्रीनाथजी), जोधपूर, बंगळुरू, आर्सिकेरी (श्रवणबेळगोळ), दावणगिरी, हुबळी जाणार्या प्रवाशांसाठी सांगली स्टेशनवरून आता अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
भाजप महाराष्ट्र रेल्वे प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांच्याकडे सर्व उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाने आणखी 4 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर केला आहे. बंगळुरू-वाराणसी-गोरखपूर एक्स्प्रेस, गोरखपूर-वाराणसी-बंगळुरू एक्स्प्रेस, मैसूर-भगतकीकोठी एक्स्प्रेस व भगतकीकोठी-मैसूर एक्स्प्रेस या 4 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या आता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत, असे आमदार गाडगीळ यांनी सांगितले.
सांगलीतून बाहेरगावी जाताना रेल्वे तिकिटावर बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे. बाहेरगावहून परत येताना रेल्वे तिकिटावर प्रवासाचे शेवटचे स्टेशन सांगली टाकावे. ज्या प्रवाशांनी या 4 रेल्वे गाड्यांची आरक्षित तिकिटे काढली आहेत, त्यांनी या तिकिटांवर त्वरित बोर्डिंग स्टेशन सांगली टाकून घ्यावे, असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी केले आहे. ज्यांना या रेल्वे गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत, ते प्रवासी गाडी सुटण्याच्या 2 तास आधी सांगली रेल्वे स्टेशनवर जाऊन जनरल तिकिटे खरेदी करू शकतात. जनरल डब्यामध्ये देखील प्रवास करू शकतात.