सांगली : राज्यात सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या मंडळींनी फोडाफोडी करून राज्यातील राजकारणाचा बट्ट्याबोळ केला, भाजपने राजकारण नासवले. आता जनतेने ओळखावे, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी केले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी थोरात सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील व डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात इतका गोंधळ कधीही पाहिला नव्हता. राज्यात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. सत्तेसाठी भाजपची धडपड सुरू असते. सत्ता वाचविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. कोण, कोठे, कसा चालला आहे, कोणत्या पातळीवर निवडणुका चालल्या आहेत? हे चित्र पाहता भाजपने राजकारण नासवल्याचे स्पष्ट होते.
ते म्हणाले, सध्या सेटलमेंटचे राजकारण सुरू आहे. त्याचे जनतेने परीक्षण केले पाहिजे. आता गोंधळाची अवस्था आहे, पण लोक लढत आहेत. यातून जे मंथन होणार आहे, त्यातून चुकणाऱ्यांना जनतेने प्रश्न विचारणे आवश्यक आहे. जनतेनेच धडा शिकवण्याची गरज आहे. कोण फोडाफोडी करतो, कोण राजकारण नासवतो, हे बघितले पाहिजे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मदत करणे चुकीचे ठरणार आहे. साऱ्यांना सामावून घेणाऱ्या, शिस्तीचा व तत्त्वाचा विचार असलेल्या काँग्रेस पक्षाच्या मागे राहिले पाहिजे.
महापौर आघाडीचाच
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन थोरात यांनी केले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजित कदम व खा. विशाल पाटील हे तिन्ही महाविकास आघाडीचे नेते आता एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.