मांजर्डे : बलगवडे (ता. तासगाव) येथे मंजूर करण्यात आलेल्या सोलर प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. रविवारी सकाळी ग्रामस्थ व कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये काम सुरू करण्यावरून हाणामारी झाली. कंपनीच्या कर्मचार्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गावातील गट नंबर 180 व 181 मधील 8.41 हेक्टरमध्ये सोलर प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. रविवारी सकाळी कंपनीचे कर्मचारी, कामगार जेसीबी घेऊन काम करण्यासाठी आले. परिसरात वृक्षारोपण केलेली झाडे काढण्यात येणार होती. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित कंपनीच्या कर्मचार्यांकडे विचारणा केली असता कर्मचार्यांनी अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. यावेळी ग्रामस्थ व कर्मचार्यांमध्ये हाणामारी झाली. ग्रामस्थांचा रोष वाढल्याचे पाहून कर्मचार्यांनी पळ काढला.
गावात सोलर प्रकल्प करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. तो रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, कंपनीच्या कर्मचार्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल तासगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
100 पेक्षा जास्त कुटुंबे उद्ध्वस्त होणार
या जागेमध्ये गावातील 100 पेक्षा जास्त कुटुंबांचे वास्तव्य आहे. अनेकांनी पक्की घरे बांधली आहेत. या जागेत सोलर प्रकल्प उभारला, तर 100 पेक्षा जास्त कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. या कुटुंबांना बेघर करणारा सोलर प्रकल्प आम्हास नको, असे ग्रामस्थांनी सांगितले.
न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय
ग्रामस्थांना अंधारात ठेवून, चुकीचे पंचनामे करून हा प्रकल्प मंजूर केला आहे. या जागेत जवळपास 8 हजारपेक्षा जास्त झाडे असताना फक्त 600 झाडांचाच पंचनामा केला आहे. त्यासह गावाला जोडणारा रस्ता, ग्रामस्थांची घरे यांचा पंचनामा केलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने न्याय न दिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.