- विवेक दाभोळे, बागणी
बागणी जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार ऊर्मिला संतोष घनवट आणि रयत क्रांती विकास आघाडीच्या मोहिनी सागर खोत यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, यावेळी प्रथमच 35 वर्षांनंतर बागणीतील उमेदवार असल्याने बागणी जि. प. गटात उमेदवार ‘स्थानिक’ हवा की ‘बाहेर’चा, या मुद्द्याभोवतीच प्रचार फिरू लागला आहे. दरम्यान, आता गटात प्रचाराचा धुरळा उडू लागला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांच्या सभा धूमधडाक्यात होत आहेत.
बागणी जि. प. मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्ग असा आरक्षित राहिला आहे. यावेळी सुरुवातीपासूनच या ठिकाणी उमेदवार मतदारसंघातील हवा, की जि. प. मतदारसंघाबाहेरचा हा वाद उफाळून आला आहे. आणि आता हाच मुद्दा चर्चेत आला आहे. बागणी जि. प. गटात बागणी आणि कारंदवाडी हे पंचायत समितीचे दोन गण आहेत. या दोन्ही गणांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण निश्चित आहे. विशेष म्हणजे वाळवा पंचायत समितीचे सभापतीपददेखील यावेळी खुलेच (अनारक्षित) राहिले आहे. परिणामी बागणी जि. प. गट हा पूर्णपणे यावेळी राजकीय आघाडीवर चर्चेत आला आहे.
बागणी जि. प. गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांच्याकडून उर्मिला संतोष घनवट यांची उमेदवारी आहेे. उर्मिला घनवट यांचे पती संतोष घनवट हे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांनी नुकताच समर्थकांसह जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करून राजकीय धूमधडाका केला आहे. तर घनवट यांना आपलेसे करून जयंत पाटील यांनी पहिल्या फेरीतच विरोधकांना शह दिला असल्याचे मानले जात आहे. आता घनवट यांनी राष्ट्रवादीतील सर्वच गटातटाच्या प्रमुख नेत्यांच्या साथीने प्रचार सुरू केला आहे. यासाठी बागणी जि. प. गटातील माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कचरे यांनी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनवट यांच्यासाठी प्रचाराची यंत्रणा ताकदीने उभी केली आहे. या भागात जिल्हा बँक संचालक वैभव शिंंदे यांनी सातत्याने संपर्क ठेवत समर्थकांना ताकद दिली आहे. शिंदे हेदेखील प्रचारात आघाडीवर आहेत. बागणी, शिगाव, कारंदवाडी या मोठ्या गावांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, घनवट यांच्याविरोधात रयत विकास आघाडी-महायुतीकडून आमदार सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या ठिकाणी थेट दुरंगी लढत होत आहे. या आधी सन 2017 मध्ये झालेल्या जि. प. निवडणुकीवेळी सागर खोत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता खोत यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधत प्रचार सुरू केला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनीदेखील मतदारसंघात सभा घेऊन प्रचाराचे रान उठवले आहे.
दरम्यान, बागणी पंचायत समितीसाठी शिगाव येथून माजी सरपंच उदयसिंह पाटील यांना जयंत पाटील यांनी संधी दिली आहे. आमदार खोत यांनी निवास पाटील यांची उमेदवारी केली आहे. बागणीतून विनोद पाटील यांची अपक्ष उमेदवारी आहे. कारंदवाडी गणात राष्ट्रवादी श. प. गटाकडून प्रशांत ऊर्फ बिट्टू पाटील, तर आमदार खोत यांच्याकडून या गणात अनिल सरदेशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही गणांसाठी प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे.
सध्या बागणी मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा होऊ लागल्या आहेत. यातून होणारे आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. बागणी जि. प. गट हा जयंत पाटील यांच्यासाठी बालेकिल्ला मानला जातो. जयंत पाटील समर्थकांची मोठी ताकद या साऱ्या भागात आहे. आमदार खोत यांनीदेखील विविध विकासकामांच्या माध्यमातून या भागात कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या उर्मिला संतोष घनवट यांचे पती संतोष घनवट यांनी सरपंच म्हणूनदेखील काम केले आहे. विरोधी गटात तर त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांना राजकारणातील उलटसुलट प्रवाहाची चांगलीच जाण आहे. आता संतोष घनवट यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे जि. प. गटातील राजकीय समीकरणात बदल झाला आहे. येथे बाजी कोण मारणार, याचा फैसला मतमोजणीनंतरच होणार आहे.