सांगली : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाच बाय सात मीटर जागा शोधली जात आहे. यामुळे पावसाची मोजणी होणार असून प्रत्येक दिवशी शासनाला अहवाल जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या 696 ग्रामपंचायती असून, सध्या 69 मंडलांच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. बहुतांशवेळी अवकाळी पाऊस हा काही गावांत पडतो, अनेक ठिकाणी पडत नाही. तो मंडल गावात पडला नाही, तर किती पाऊस झाला, याची अचूक नोंद होत नाही. नुकसानीचा पंचनामा करताना अडचण येते. त्यामुळे प्रत्येक गावात असे केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही केंद्रे सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहेत. तापमान, आर्द्रता, वार्याचा वेग, दिशा, वायुदाब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवसाचा पाऊस या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. अतिवृष्टीने नुकसान झाले आहे का, याचा पुरावा म्हणून या नोंदी महत्त्वाच्या असणार आहेत. खासगी एजन्सीद्वारे ही यंत्रणा हाताळली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. शासकीय जागा प्राधान्याने घेतली जाणार आहे. या केंद्राचा शेती विकासात उपयोग होणार आहे. सध्या मंडलाच्या ठिकाणी पावसाची मोजणी केली जाते. तालुक्याच्या ठिकाणी झालेली पावसाची मोजणी ही संपूर्ण तालुक्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात एकाच तालुक्यात वेगवेगळे पावसाचे आकडे असतात. यामुळे नुकसान भरपाईसाठी पंचनामा करताना वास्तव आकडे येत नाहीत. आता ग्रामपंचायत स्तरावर मोजणी होणार असल्यामुळे वास्तव माहिती मिळणार आहे. याचठिकाणी आगामी पावसाची माहितीही उपलब्ध होणार आहे.