सांगली

Fake Currency Case: बनावट नोटा प्रकरणाची ‌‘एटीएस‌’, ‌‘आरबीआय‌’कडून दखल

संशयितांची डीएनए चाचणी : बनावट नोटांचा सर्वांगीण तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

स्वप्निल पाटील

मिरज : कोल्हापुरात पकडण्यात आलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी सोलापूर एटीएस (दहशतवादविरोधी पथक) आणि आरबीआयकडून (भारतीय रिझर्व्ह बँक) दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताची डीएनए चाचणी करण्यात येणार असून त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात तब्बल 98 कोटी 42 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. याचा मुख्य सूत्रधार पोलिस हवालदारच असल्याने सर्व तपास यंत्रणांकडून याचा सखोल तपास केला जात आहे. दरम्यान, बनावट नोटांचा आता एटीएसकडूनही तपास केला जात आहे. एटीएसचे सोलापूर येथे कार्यालय असून या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच मिरजेस भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अटकेत असलेला मुख्य सूत्रधार, बडतर्फ पोलिस हवालदार इब्रार इनामदार याच्याकडेही एटीएसने चौकशी केल्याचे सांगण्यात आले.

तसेच सर्व संशयितांचे डीएनए नमुनेही घेण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने पोलिस सर्व बाजूंनी याचा तपास करीत आहेत. परंतु या तपासाबाबत मात्र अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे, तर तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, या बनावट नोटा प्रकरणाची ‌‘आरबीआय‌’कडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही याबाबत माहिती घेण्यात येत आहे. कारण संशयितांनी छापलेल्या नोटा या हुबेहूब पाचशे, दोनशे रुपयांच्या आहेत. एक कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईत या नोटा कमिशनवर वितरित करण्यात येणार होत्या, परंतु यापूर्वीच त्याचा भांडाफोड झाला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची ‌‘आरबीआय‌’ही माहिती घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT