आटपाडीचा विद्यार्थी 'नीट'मध्ये देशात दहावी रँक 
सांगली

Sangli News : आटपाडीचा विद्यार्थी 'नीट'मध्ये देशात दहावी रँक

अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत मिळवले अभूतपूर्व यश

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : मोठी स्वप्ने पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचे, हा मंत्र जपत औटेवाडी (ता. आटपाडी) येथील मोहनीश मारुती भोसले याने देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'नीट-२०२६' परीक्षेत देशात १० वा, तर महाराष्ट्रात २ रा क्रमांक पटकावून आटपाडी तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.

मोहनीशने ७२० पैकी तब्बल ७०५ गुण मिळवत हे दैदिप्यमान यश संपादन केले. विशेष म्हणजे जीवशास्त्र (बायॉलॉजी) विषयात ३६० पैकी ३६० गुण मिळवत त्याने परिपूर्ण कामगिरी केली. एवढेच नव्हे, तर त्याने 'एमएचटी-सीईटी'मध्ये १०० पर्सेंटाइल आणि 'जेईई मेन' परीक्षेत ९९.६३ टक्के गुण मिळवून आपल्या अफाट बुद्धिमत्तेची छाप पाडली.

मोहनीशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्प्रिंगडेल पब्लिक स्कूलमध्ये झाले. दहावीत ९४ टक्के गुण मिळवल्यानंतर त्याने आतिग्रे येथील संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजमधून बारावीत ८७ टक्के गुण मिळवले. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने केलेल्या अथक परिश्रमाचे आज राष्ट्रीय यशात रूपांतर झाले आहे. त्याच्या या यशात कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. वडील प्रा. मारुती भोसले पुण्यातील श्री शाहू मंदिर महाविद्यालयात सांख्यिकीचे प्राध्यापक असून, आई अस्मिता भोसले यांनी त्याला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन दिले. तर मोठा भाऊ डॉ. आशुतोष याच्याकडूनही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. आटपाडी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे मुख्य विश्वस्त टी. ए. चव्हाण हे त्याचे आजोबा आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहण्यास घाबरू नये; सातत्य, योग्य दिशा आणि आत्मविश्वास असेल तर राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च यश मिळवणे कठीण नाही, हेच मोहनीशने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT