आटपाडी : आटपाडी तालुक्यात राजारोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची आणि कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यातील वाळू तस्करीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे. तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू उपसा वाढला आहे. नुकताच हजारो ब्रास वाळूचा साठा सापडला होता. मात्र कारवाईबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वाळू तस्करीत काही गुंड प्रवृत्तीचे लोक सक्रिय आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. बेकायदेशीर वाळू उपसा तत्काळ थांबवावा. जबाबदार अधिकार्यांवर आणि वाळू माफियांवर आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आटपाडी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून धरणे आंदोलनाचा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.