आटपाडी : आटपाडी पोलिसांनी नेलकरंजी फाटा, खरसुंडी-बलवडी मार्ग आणि भिवघाट-आटपाडी रस्त्यावर तीन ठिकाणी सापळा रचून तब्बल ११ पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे, दोन स्पेअर मॅगझीन आणि इतर साहित्य असा ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे आटपाडीत कार्यरत असलेल्या शस्त्र तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पुरवठादारापर्यंत पोहोचल्याने तपासाला मोठे वळण मिळाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार हणमंत किसन लोहार यांच्या फिर्यादीवरून मयुरेश मनोहर आदाटे (वय २५, रा. विटा, सध्या रा. चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले (वय २४, रा. जांभुळ मळा, ता. खानापूर), वैभव ऊर्फ गब्बर संजय इंगळे (वय २१, रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर) तसेच मध्य प्रदेशातील 'पाजी' या संशयितांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मयुरेश आदाटे, मारुती गुजले व वैभव ऊर्फ गब्बर इंगळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू आहे.
दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी नेलकरंजी फाटा, खरसुंडी-बलवडी मार्ग आणि भिवघाट-आटपाडी रस्ता परिसरात पोलिसांनी सलग कारवाया करून संशयितांना जेरबंद केले. चौकशीत जप्त केलेली पिस्तूल मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी काही पिस्तूल विक्रीसाठी आणण्यात आली होती, तर काहींची खरेदी झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या कारवाईमुळे आटपाडी तालुक्यात अवैध शस्त्रांचा पुरवठा नेमका कोणासाठी केला जात होता आणि यामागे संघटित टोळी कार्यरत आहे का, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सहायक फौजदार संजय पाटील, हवालदार सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हणमंत लोहार, सुशील मस्के, कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन घस्ते, गणेश शिंदे, सुशांत चिले, तसेच सायबर सेलचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील आणि इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली.