आटपाडीत गुप्तांग पिरगळून तरुणाचा खून? 
सांगली

Sangli Crime : आटपाडीत गुप्तांग पिरगळून तरुणाचा खून?

काठीने मारहाण; हृदयविकाराचा बनाव करून रात्रीच अंत्यविधी

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी येथील गोरडवस्ती परिसरात क्षुल्लक वादातून एका तरुणाला काठीने मारहाण करून खाली पाडल्यानंतर गुप्तांग जोराने पिरगळून व दाबून त्यास जीवे मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी घडली. आप्पा नाथा अनुसे (वय ४३) असे मृताचे नाव आहे. मृत्यूचे खरे कारण लपवण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचत रात्रीच अंत्यविधी उरकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नातेवाईक व ग्रामस्थांची दिशाभूल करून रात्रीच्या वेळी घाईगडबडीत अंत्यविधी पार पाडत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

याप्रकरणी धुळदेव नाथा अनुसे (वय ४०), संगीता सुखदेव कोळेकर (वय ४५) आणि पारूबाई नाथा अनुसे यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळदेव अनुसे व संगीता कोळेकर या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गोरडवस्ती येथील संशयितांच्या घरासमोर हा प्रकार घडला. आप्पा अनुसे हे वारंवार किरकोळ कारणावरून भांडण काढत असल्याच्या रागातून संशयितांनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला चढवला. धुळदेव अनुसे याने काठीने मारहाण केली, तर संगीता कोळेकर व पारूबाई अनुसे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आप्पा अनुसे खाली पडल्यानंतर रागाच्या भरात धुळदेव याने आप्पा यांचे गुप्तांग हातात धरून जोराने पिरगळले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी बापूराव रामचंद्र व्हनमाने (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या धुळदेव अनुसे व संगीता कोळेकर यांची कसून चौकशी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण, हल्ल्याचे स्वरूप व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाबाबत अधिक तपास सुरू आहे.

रात्रीच्या वेळी घाईगडबडीत अंत्यविधी

घटनेनंतर हा गुन्हा दडपण्यासाठी संशयितांनी आप्पा अनुसे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची आवई उठवली. नातेवाईक व ग्रामस्थांची दिशाभूल करून रात्रीच्या वेळी घाईगडबडीत अंत्यविधी पार पाडत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT