आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी तहसील कार्यालयात पार पडली. ही प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सोडतीत एकूण १७ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने स्थानिक राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये नवीन महिला उमेदवारांना राजकारणात संधी मिळणार आहे.
या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय गटांमध्ये नव्या बदललेल्या रचनेची आणि संभाव्य रणनीतीची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक प्रस्थापित नेत्यांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या असून अनेक तरुण आणि नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव ठरल्यानंतर आटपाडीत काही प्रमुख राजकीय मंडळी पुन्हा सक्रिय झाली असून, उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे.महिला आरक्षणामुळे अनेक कार्यकर्त्यांनी घराघरांतून महिलांना राजकीय सहभागासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.
नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार आहे.सर्व पक्षानी जय्यत तयारी केली आहे.ऐनवेळी धक्कादायक आघाडी आणि युती होण्याची शक्यता वाढली आहे.आरक्षणामुळे घडलेला बदल लक्षात घेऊन मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
सर्वसाधारण महिला राखीव - प्रभाग १,१०,१४,१५,१७
अनुसूचित जाती - प्रभाग ५
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- प्रभाग ८,११,२
अनुसूचित जाती महिला- प्रभाग ९
नागरिकांचा मागास प्रवर्ग -प्रभाग ४,१३
सर्वसाधारण -प्रभाग ३,६,७,१२,१६