आटपाडी : आटपाडी शहरातील साई मंदिर ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक या सुमारे वीस कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. शहराच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा रस्ता भविष्यातील वाहतूक सुलभतेसाठी उपयुक्त ठरणार असतानाच, सध्या मात्र या कामाभोवती अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
शहरात बस स्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने या रस्त्याचे काम दीर्घकाळ रखडले होते. मात्र अतिक्रमण हटविण्याऐवजी अतिक्रमणांना अभय देत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी नियोजित रुंदीपेक्षा रस्ता अरुंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा फटका शहराच्या वाहतुकीला बसणार आहे. बसस्थानक परिसर हा आधीच वर्दळीचा भाग आहे. येथे दररोज शेकडो वाहने, प्रवासी, हातगाड्या आणि खासगी वाहनांची गर्दी असते. अशा ठिकाणी अरुंद रस्ता झाल्यास भविष्यात कायमस्वरूपी वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय अटळ ठरणार आहे. हे सर्व स्पष्ट असतानाही या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणात लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत प्रशासन तसेच तथाकथित सूज्ञ नागरिकांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकास कामात दूरदृष्टीचा अभाव असून, ठोस निर्णय न घेतल्यास हा रस्ता शहरासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणांनी जागे होऊन अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी होत आहे.