आटपाडी : शेटफळे-कोळा मार्गावरील पात्रेवाडी गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात तळेवाडी येथील शेतकरी गोरख नारायण सरक (वय ४२) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत गोरख सरक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्या पत्नी या अपघातातून बचावल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, गोरख सरक हे सोमवारी सकाळी पत्नीसमवेत दुचाकीवरून दूध डेअरीत दूध घालण्यासाठी निघाले होते. सकाळी सुमारे आठच्या सुमारास पात्रेवाडीजवळ शेटफळेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकी रस्त्यावर दूरपर्यंत फेकली गेली. गंभीर जखमी झालेल्या गोरख सरक यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. परिसरातील लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान, अपघात घडताच पिकअप चालकाने वाहनासह सांगोला तालुक्यातील कोळा गावाच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मनमिळाऊ आणि कष्टाळू स्वभावामुळे परिचित असलेल्या गोरख सरक यांच्या अकाली निधनाने तळेवाडी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.