आटपाडी महसूलची क्यूआर कोडद्वारे संपर्क यंत्रणा कार्यान्वित  
सांगली

आटपाडी महसूलची क्यूआर कोडद्वारे संपर्क यंत्रणा कार्यान्वित

तहसीलदार सागर ढवळे यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नाही किंवा ते भेटत नाहीत, अश्या अनेक तक्रारी आहेत. महसूल विभाग अस्तित्वात आल्यापासून या तक्रारी आहेत. सर्वसामान्य लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी रविवारी (दि.६) आटपाडी महसूल विभागाने व्हाट्सअप क्यूआर कोडद्वारे संपर्क करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रम नागरी सेवांचे सुलभीकरण अंतर्गत हा विधायक उपक्रम सुरु केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्राम महसूल अधिकारी यांना दोन तीन गावांचा कारभार बघावा लागतो. महसूल विभागाची बैठक आणि नियमित कामकाजामध्ये ही मंडळी व्यस्त असतात. सात-बारा, पीक पाणी, राहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, घराच्या आणि जागेच्या नोंदी तसेच विविध कामासाठी लागणारे दाखले हे अधिकारी देतात. पण अनेकवेळा या किरकोळ कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे तहसीलदार सागर ढवळे यांनी आपल्या कार्यालयात त्यांचा स्वतःचा आणि तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्या व्हाट्सअप क्यू आर कोड असलेला फलक लावला आहे. सध्या सर्वच लोकांच्याकडे आधुनिक मोबाईल आहेत. त्यामुळे हा क्यू आर कोड वापरून त्यांना संपर्क करता येणार आहे.

अधिकारी भेटले नाहीत तरी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र संपर्क साधता येणार आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्याशी देखील सहज संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे लोकांची कामे लवकर मार्गी लागतील, वेळ वाचेल आणि त्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्राम महसूल अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे लवकर दाखले मिळत नाहीत. नोंदी रखडल्या आहेत. आमच्या गावात बेकायदा वाळू उपसा होत आहे. अशा अनेक तक्रारींची दाखल घेतली जावी. पारदर्शक कारभाराद्वारे कामांचा निपटारा व्हावा, कामाला आधुनिक तंत्राद्वारे गती द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा
तहसीलदार सागर ढवळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT