तासगाव : एका फायनान्स कंपनीचा कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून कुटूंबातील महिलेसह मुलगा व पतीला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी बानुताई साहेबराव मलमे (वय 47, रा. दहिवडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मारहाणप्रकरणी फायनान्स कंपनीचा भिवघाट शाखेचा वसुली अधिकारी किरण जाधव (रा. पळशी ता. खानापूर) , जयदीप हणमंत शिंदे (रा. जरंडी ), सचिन राजेंद्र पैलवान ( रा. दहिवडी) व प्रकाश थोरात ( पूर्ण नाव माहीत नाही) या संशयिताचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी , फिर्यादी बानुताई या सकाळी घरात असताना फायनान्स कंपनीचा भिवघाट शाखेचा वसुली अधिकारी किरण जाधव याने फिर्यादीचा पुतण्या प्रताप याने फायनान्सचा हप्ता भरला का नाही म्हणून त्याच्याशी वाद घालत होता. त्यावेळी त्याचा मोबाईल भांडणामध्ये कोठेतरी पडला.
परत थोड्याच वेळात संशयित किरण याच्यासोबत जयदीप, सचिन व प्रकाश थोरात हे सर्वजण फिर्यादीच्या घरासमोर आले. फिर्यादीचा पुतण्या याला संशयित किरण याने थोबाडीत मारून तेथेच पडलेला दगड घेऊन फिर्यादीचा पुतण्या यांच्या पाठीत मारला. त्यावेळी फिर्यादीचे पती साहेबराव व मुलगा अक्षय यांना का मारताय म्हणून भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता जयदीप याने काठीने फिर्यादीचा मुलगा अक्षय याच्या दंडावर, पाठीत मारहाण करून जखमी केले. संशयित सचिन व प्रकाश यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.
संशयित जयदीप हा त्याचे जवळील चाकूने फिर्यादीचा पुतण्या प्रताप यास मारण्यास अंगावर गेला असता फिर्यादी या मध्ये पडले असता त्यावेळी संशयित किरण याने फिर्यादीला ढकलून देऊन फिर्यादीच्या डावे हाताचे मनगटावर काठीने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.