Sangli News
शामरावनगरमध्ये गुंडावर प्राणघातक हल्ला file photo
सांगली

शामरावनगरमध्ये गुंडावर प्राणघातक हल्ला

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : येथील शामरावनगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसीन आलम पठाण (वय 32, रा. गणेशनगर) याच्यावर चाकू, एडक्याने वार करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पठाण गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर तो पळत सुटला होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांवर सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शिवीगाळीचा जाब विचारल्यावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान रियाज मुजावर, त्याची आई, इरफान मुजावर, आयान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडील रियाज मुजावर (सर्व रा. शामरावनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. मोहसीन पठाण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. गुंड महंमद नदाफ याच्या टोळीत तो सक्रिय होता. मोहसीन मूळचा कोल्हापूरचा असून गणेशनगरमध्ये त्याची आई राहते. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शामरावनगरमधील एकता चौकात थांबला होता.

त्यावेळी त्याने मित्र सलमानला फोन केला. हा फोन सलमानच्या आईने उचलला. तिने मोहसीनला शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने पठाण सलमानच्या घरी गेला. पठाणने शिवीगाळ केल्याचा जाब विचारताच संशयितांनी त्याला घराबाहेर काढले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. संशयितांनी चाकू, एडक्याने पठाणच्या डोक्यात वार केला. वार वर्मी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. संशयितांनी पुन्हा त्याच्यावर चाल करताच त्याने पळ काढला. तो शासकीय रुग्णालय परिसरात धावत होता.

रात्री साडेअकराच्या सुमारास पठाण एका इमारतीत लपून बसला. त्यावेळी शहर पोलिस दाखल झाले. जखमी पठाणला उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डोक्यात, गालावर वार झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सलमान मुजावरसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहसीन पठाणवरही गुन्हा दाखल

दरम्यान, मोहसीन पठाण याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सलमान मुजावर याने फिर्याद दिली आहे. यात मोहसीन याने घरी येऊन, घरी येऊन, तू फोन का उचलत नाहीत, तू माझ्यासोबत का येत नाही. तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून कमरेचा कोयता काढून हल्ला केला. यात सलमानचे डोके, हात, गालाला दुखापत झाली आहे. सलमानच्या फिर्यादीवरून गुंड मोहसीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT