मृत अजय बागडी व केराप्पा बागडी pudhari photo
सांगली

आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

Ashta accident: होतकरु तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : येथील मस्के मळा परिसरात बुधवारी (दि. 30) दुपारी पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण विहिरीत बुडाले. अजय पप्पन बागडी (वय 19), केराप्पा धोंडिबा बागडी (27, दोघेही रा. नागाव रोड झोपडपट्टी, आष्टा) अशी मृतांची नावे आहेत.

आष्टा-नागाव रोड झोपडपट्टीतील अजय व केराप्पा बागडी हे दोघे मित्र बुधवारी दुपारी पोहण्यासाठी मस्के मळा परिसरातील विहिरीत गेले होते. पोहताना एकजण पाण्यात बुडू लागल्याने दुसर्‍याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडू लागले. दोघांनीही आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. काहींनी घटनेची माहिती आष्टा पोलिसांना दिली.

आष्टा पोलिसांनी घटनेची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स व आपत्कालीन पथकास देऊन मदतीसाठी पाचारण केले. काही वेळातच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसमवेत विहिरीची पाहणी केली. साठ फूट खोल असलेल्या या विहिरीत चाळीस फुटापर्यंत पाणी आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या कैलास वडर, सागर जाधव, आसिफ मकानदार, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, महेश गव्हाणे, अमीर नदाफ, महादेव वनखंडे यांनी काही वेळातच विहिरीच्या तळाला जाऊन दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

मृत तरुण नागाव रोड झोपडपट्टीमधील रहिवासी असून दोघेही कष्टकरी कुटुंबातील होते. दोघा होतकरु तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT