आष्टा : आष्टा येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी (अंबाबाई) देवीच्या भावई उत्सवातील कंकण विधी व 'आळूमुळू' हा पारंपरिक खेळ अत्यंत उत्साहात पार पडला. उत्सवाची सुरुवात शुक्रवारी दीपप्रज्वलनाने झाली असून, रात्री ११ वाजता कंकण विधी झाला.
या विधीसाठी खेळातील १६ खेळगडी भावकाई देवीच्या मंदिरावळ एकत्र जमले. दैत्याचा वध करण्याचा निश्चय करत सर्वांनी दाढी, मिशा व डोक्याचे केस काढून युद्धाची प्रतिज्ञा केली. यानंतर खेळगड्यांच्या हातात लोकरीचा दोरा (कंकण) बांधण्यात आला.
शनिवारी सायंकाळी उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला 'आळूमुळू' खेळ झाला. पिसे रूप घेतलेले देवीचे सैन्य घरोघरी फिरून दैत्याचा शोध घेत असल्याचे कथानक या खेळात दाखवले जाते. आळूमुळू होण्याचा मान जैन समाजातील सरडे घराण्याकडे आहे. मारुती मंदिरामागील ओढ्यात आळूमुळूची वेशभूषा करण्यात आली. भुतांचा राजा वेताळासारखा काळा वेश परिधान केलेले आळूमुळू दोन्ही हातात लिंबाच्या फांद्या घेऊन गर्दी हटवत पुढे जात होते, तर इतर खेळगडी त्यांच्याभोवती फेर धरून गाणी म्हणत होते. शनिवारी रात्री 'घोडी' खेळ झाला. आज रविवारी जोगण्याचा उपवास असून विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
बाजारपेठ गजबजली; पालिकेची जोरदार तयारी
महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवासाठी आष्टा नगरी सज्ज झाली असून बाजारपेठ गजबजून गेली आहे. आष्टा नगरपालिकेच्यावतीने रस्त्यांची साफसफाई, औषध फवारणी व पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या असून भाविक व व्यावसायिकांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी सांगितले.
हुल्लडबाजांवर कडक कारवाईची मागणी
उत्सवादरम्यान काही युवकांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या हुल्लडबाजीमुळे महिला उत्सवापासून दूर राहणे पसंत करत असल्याने, अशा उपद्रवी घटकांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिक, खेळगडी व मानकऱ्यांमधून होत आहे.