आष्टा : विकास कामांच्या मंजूर निविदेवरून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांच्यात मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. शिवीगाळ, हमरीतुमरी आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारांमुळे पालिकेत तणाव निर्माण झाला. भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिका परिसरात जमा झाले. आष्टा पोलिसांनी तत्परतेने पालिका परिसरात बंदोबस्त वाढविल्याने पुढील अनर्थ टळला.
सध्या नगरपरिषदेवर प्रशासक आहे. प्रशासनाने येथील सुतार गल्लीतील काही विकास कामांच्या निविदा काढल्या आहेत. निविदा आष्टा शहराबरोबरच बाहेरगावच्या काही ठेकेदारांनी भरल्या आहेत. निविदा भरण्यावरून भाजपचे माने व राष्ट्रवादीचे जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शिवीगाळ व एकमेकांच्या अंगावर धावून गेले. घटनेची माहिती शहरात पसरल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते नगरपालिकेसमोर जमा झाले. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील हा पहिला संघर्ष नाही. याआधीही आष्ट्यातील विविध विकासकामे, वर्चस्व व श्रेयवादावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. दोन महिन्यापूर्वी मातंग समाज स्मशानभूमी विटंबनेवरून तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांनी बेमुदत उपोषण केले होते. यावरून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खंडणी व अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. सोमलिंग तलाव सुशोभिकरण, हिंदू स्मशानभूमी सुशोभिकरण, मटण मार्केट लोकार्पण यासह शहरातील विविध विकास कामे यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीने भाजपवर अपारदर्शक कारभाराचा आरोप केला, तर भाजपने याला राजकीय उद्देश असल्याचे सांगितले.
युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी एका निवेदनाद्वारे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या विकास कामांची निविदा प्रक्रिया ही भाजपच्या गुंडशाही व दडपशाहीच्या वर्चस्वाखाली राबविलेली आहे. यामध्ये पालिका प्रशासन व पोलिस खातेही सहभागी आहे. आम्ही भाजपच्या दडपशाहीचा जाहीर निषेध करतो. प्रशासनाने तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा निकोप पध्दतीने ही निविदा प्रक्रिया राबवावी. आष्टा नगरपालिकेच्यावतीने आष्टा शहरात वार्षिक रस्ते विकास नफा-तोटा निधी योजनेच्या माध्यमातून 2 बोळांचे काँक्रिटीकरण, 2 रस्त्यांचे काँक्रिटीकरण,2 रस्त्यांचे खडीकरण आदी सहा कामांची निविदा प्रक्रिया राबविली आहे. श्री. मुसळे यांच्या नावे मोहन तावदर हे ठेकेदार निविदा भरण्यास आले असता, पालिका प्रशासनाने त्यांना निविदा फॉर्म वेळेत न देणे, चुकीची माहिती देण्याचा उद्योग केलेला आहे. तावदर यांनी बयाणा रक्कम भरून निविदा फॉर्म भरला होता. मात्र त्यावर नाव व मोबाईल नंबर भरण्यास ते बाहेर आले असता, भाजपच्या गुंडांनी त्यांना दमदाटी करून त्यांचे अपहरण केले. त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले व निविदा फॉर्म जमा करण्याची वेळ संपल्यानंतर त्यांना सोडून दिले. ही निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी, अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करू.