आष्टा : आष्टा-बागणी रस्त्यावर शुक्रवारी रात्री दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन युवक गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका युवकाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात ओम धर्मेंद्र शेडबाळे (वय 22, रा. आष्टा, डांगे गल्ली) हा युवक जागीच ठार झाला होता, तर संदीप बाजीराव पाटील (वय 31, रा. बावची रोड, आष्टा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबररोजी रात्री ओम शेडबाळे हा वडगाव येथून दुचाकीवरून (क्र. एमएच 10 ईएफ 8573) आष्ट्याकडे येत होता, तर संदीप पाटील व त्याचा मित्र स्वप्निल बामणे (रा. आष्टा) दुचाकीवरून (क्र एमएच 10 बीडी 6657) आष्ट्याकडून बागणीकडे निघाले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आष्टा-बागणी रस्त्यावर ढोले मळ्याजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ओम शेडबाळे हा जागीच ठार झाला होता, तर संदीप पाटील व स्वप्निल बामणे हे गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना आष्टा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र संदीप पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.