सांगली : पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असणारे अशोक काकडे यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. डॉ. दयानिधी यांनी अडीच वर्षे सांगली जिल्ह्यात काम केले. अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मंगळवारी दुपारी बदलीचे आदेश काढले.
अशोक काकडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील किकवी (ता. भोर) येथील असून, ते 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून निवड झाल्यानंतर त्यांनी यापूर्वी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक आणि पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. काकडे यांनी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून 2003 ते 2005 मध्ये काम केले आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी काम केल्याने आपणाला जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. लवकरच आपण पदभार स्वीकारू, असे त्यांनी सांगितले.
डॉ. दयानिधी यांनी 29 जुलै 2022 रोजी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची सांगलीला बदली झाली होती. आता त्यांची बदली नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे.