वारणावती : चांदोलीत प्राण्यांच्या अधिवासासाठी त्यांना पोषक वातावरण तयार केले जात आहे. परिणामी अभयारण्य परिसरात प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. प्राण्यांना त्यांच्या ठिकाणावर जवळपास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वन्यजीव विभागामार्फत 24 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. नैसर्गिक झरे आणि पाणवठ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तो अधिकच वाढत आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. त्यांना पुरेसे आणि त्यांच्या अधिवासाच्या जवळ पाणी मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी चांदोली जंगलातील नैसर्गिक झरे, पाणवठ्यांची स्वच्छता वन्यजीव विभागाने केली आहे. 24 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले असून, त्या ठिकाणी टँकरने पाणी देण्याचे काम सुरू आहे. अभयारण्य परिसरात एकूण 78 नैसर्गिक झरे आहेत. उन्हाळ्यापर्यंत या झर्यात पाणी असते. या झर्यात झाडपाला, माती, दगड पडलेले असतात. ते स्वच्छ करण्याचे काम दरवर्षी वन्यजीव विभागामार्फत केले जाते. सध्या या झर्यांची स्वच्छता झाली असून, ते प्राण्यांची तहान भागवायला सज्ज झाले आहेत. अभयारण्य परिसरातच चांदोलीचा वसंत सागर जलाशय आहे. या जलाशयाच्या बॅक वॉटरमध्येही अनेक प्राणी आपली तहान भागवताना दिसत आहेत.
उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटण्याची दाट शक्यता असते. त्यातून मोठे नुकसान होते. हा धोका टाळण्यासाठी ठिकठिकाणी जाळपट्टे करण्यात आले आहेत. 22 किलोमीटरचे जाळपट्टे करून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे म्हणाले, काही ठिकाणी प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची सोय करण्याची आवश्यकता असते. यंदा 24 ठिकाणी अशी सोय करण्यात आली आहे. बशीच्या आकाराचे हे पाणवठे आहेत. या ठिकाणी टँकरने पाणी सोडले जाते. एका पाणवठ्यात पाचशे ते सातशे लिटर पाणी सोडता येते. ते नियमित भरलेले राहतील, अशी दक्षता घेतली जाते. टँकर पोहोचू शकेल, अशा ठिकाणीच हे पाणवठे आहेत. अभयारण्याचे क्षेत्र मोठे आहे. प्राण्यांची संख्या सर्वच भागात आहे. त्यांना त्या-त्या ठिकाणी पिण्याचे पाणी सहज उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.