सांगली/जत / विजापूर : चेहर्यावर बुरखे बांधलेल्या आठ दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेवर दरोडा टाकत तब्बल 50 किलो सोने आणि आठ कोटी रुपयांची रोकड लांबवली आहे. 50 किलो सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किमत 55 कोटी असून, 8 कोटींच्या रोकडसह एकूण 63 कोटींचा ऐवज लांबवण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूलच्या धाकाने अधिकारी-कर्मचार्यांचे हातपाय बांधून घालून लूट केली. उत्तर कर्नाटातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दरोडा आहे. तीन महिन्यांपूर्वी मनगोळीमध्ये 29 कोटींची लूट झाली होती. त्यापेक्षाही हा दरोडा मोठा असून, त्यामुळे विजापूर जिल्हा हादरून गेला आहे.
महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ असलेल्या चडचण शहरातील (जि. विजापूर) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कामकाज मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू होते. ते संपण्याच्या सुमारास सायंकाळी सातच्या दरम्यान दरोडेखोर बँकेत घुसले. त्यांनी मिलिटरी ड्रेस परिधान केलेले होते. मुख्य दरवाजातून बँकेत प्रवेश करून, देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी व्यवस्थापक आणि कर्मचार्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे हात-पाय बांधून अंदाजे 8 कोटींची रोख रक्कम आणि सुमारे 50 किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती बँकेतील कर्मचारी आणि पोलिस सूत्रांनी दिली आहे.चडचण शहरातील पंढरपूर मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या भागात ही शाखा आहे.
घटनास्थळी गर्दी
दरोड्याची माहिती कळताच हजारोंच्या संख्येने नागरिक बँकेसमोर जमा झाले होते. त्यांना हटवण्यासाठीही पोलिसांना कसरत करावी लागली.
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी
सांगली : विजापूर जिल्ह्यातील चडचण येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी हुलजंतीमार्गे पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग तसेच सातार्याच्या दिशेने जाणार्या प्रत्येक रस्त्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
हुलजंती येथे संशयास्पद मोटार
दरोडेखोरांनी वापरलेली मोटार (केए 24 डीए 2456) मंगळवेढा-हुलजंती गावाजवळ आढळून आली. रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मोटार बंद पडल्याने दरोडेखोरांनी मोटार सोडून पलायन केले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु दरोडेखोर शस्त्रासह पळून गेले. मंगळवेढा पोलिसांचे पथक हुलजंती येथे रात्री उशिरापर्यंत तपास करत होते. चडचण व हुलजंती येथील घटनांचा परस्परांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्राच्या दिशेने पलायन
दरोडेखोरांनी लुटलेले सोने आणि रोकड वाहनांत भरून ते महाराष्ट्राच्या दिशेने फरार झाले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जिल्हा पोलिसप्रमख लक्ष्मण निंबरगी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी सुरू आहे. तसेच, बँकेतील कर्मचार्यांकडून तपशील गोळा केला जात आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चौकशी वाढवण्यात आली आहे.
मंगळवेढा व चडचण पोलिसांची संयुक्त तपासणी
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, उपनिरीक्षक विजय पिसे, उपनिरीक्षक नागेश बनकर यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. विजयपूर येथील पोलिस यंत्रणाही दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत संयुक्त मोहिम सुरू होती. डॉग स्कॉड व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.