सांगली

सांगली : गाव तसं चांगलं; पण तळीरामांच्या नावानं चांगभलं!

निलेश पोतदार

बेडग : पुढारी वृत्तसेवा टाकळी (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीकडे बीअर बार व परमिट रूमच्या ना हरकत दाखल्यासाठी तब्बल 27 जणांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश आहे. गावाजवळून गेलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गामुळेच गावकर्‍यांचे हे मद्यप्रेम उफाळून आल्याचे स्पष्ट आहे. परंतु गावात बारना परवानगी देण्यास गावातील महिलांचा प्रचंड विरोध आहे.

मंगळवार, दि. 10 रोजी टाकळी गावची ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत मागणी केलेल्या बारना ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय होणार आहे. टाकळी हद्दीतून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग व हेरवाड-दिघंची हा राज्यमार्ग गेल्याने या मार्गावरील रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या संधीचा फायदा घेऊन रस्त्यालगत विविध व्यवसाय करण्यास अनेकजण उत्सुक आहेत. रत्नागिरी- नागपूर महामार्गात टाकळी व बोलवाड येथील अनेक शेतकर्‍यांची शेती गेली आहे. त्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे.

टाकळी व बोलवाडमधील काही शेतकर्‍यांची शेती महामार्गाच्या लगत शिल्लक राहिली आहे. तेथे काही शेतकरी हॉटेल, पेट्रोल पंप आदी व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. काही भांडवलदार या मार्गालगतच्या शेतकर्‍यांकडून शेती खरेदी करून अथवा भाड्याने घेऊन बीअर बार-परमिट रूम काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी तेथील स्थानिक ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे जवळपास 7 हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीत ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडे तब्बल 27 अर्ज प्राप्त झाले आहेत.

1 मे रोजी महाराष्ट्रदिनी ग्रामसभेचे आयोजन करून बीअर बार व परमिट रूमच्या नाहरकत दाखल्यांबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. परंतु कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करून मंगळवार, दि. 10 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या दिवशी बीअर बार व परमिट रूमच्या ना हरकत दाखल्यांचा काय निर्णय होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

महिलांचा विरोध!

टाकळी ग्रामपंचायतीकडून परमिट रूम, बीअर बारसाठी ना हरकत दाखला देण्यात येऊ नये, अशी मागणी महिलांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

SCROLL FOR NEXT