कसबे डिग्रज : येथील नळ पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी खणीसमोरील रस्त्यावर अमावास्येच्या मध्यरात्री अज्ञातांनी दोन ओल्या कवाळूसदृश फळांना मानवी चेहर्याचा आकार करून त्यांची पूजा केल्याचे आढळून आले.
पाण्याच्या टाकीसमोरील मुख्य रस्त्यावरून या ठिकाणच्या लोकवस्तीत जाणार्या रस्त्याच्या मध्यभागी रांगोळी काढून पूजा मांडण्यात आली होती. मानवी आकार देऊन ठेवलेले दोन कवाळू, तीन लिंबू यावर हळद, कुंकू, गुलाल टाकण्यात आला होता. सकाळी या परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आला. बघ्यांची गर्दी झाली.
चार महिन्यांपूर्वी मौजे डिग्रज येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस पूजा करण्यात आली होती. दोन अल्पवयीन मुले व जवळपास आठ-दहाजण या ठिकाणी होते. ग्रामस्थांनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कसबे डिग्रज येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार घडला. तसाच प्रकार शनिवारी अमावास्येच्या मध्यरात्री येथील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर घडला.