इस्लामपूर : संपूर्ण सूतगिरणी उद्योग संकटात असताना शेतकर्यांना आणि कामगारांना सरकारने दिलासा देणे आवश्यक आहे. शेतकर्यांकडून कापूस महागात घेतला जातो आणि बाजारात सुताचे भाव घसरलेले आहेत. या तफावतीमुळे गिरण्या उद्ध्वस्त होत आहेत. सरकारने धोरणात्मक पावले उचलली नाहीत तर ग्रामीण भागातील रोजगार पूर्णपणे बंद पडेल, असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले.
येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अमोल चौधरी होते. वारणा व्हॅली खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सी. बी. पाटील, अॅड. संपतराव पाटील, सुमंत महाजन, विश्वनाथ डांगे, वैभव पवार, सागर मलगुंडे, अजित पाटील, बाळासाहेब खैरे, जयराज पाटील, धनपाल माळी, संजय हवलदार, अशोक पाटील, अशोक देसाई, तसेच डायरेक्टर अॅड. चिमण डांगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजली ठराव बजरंग कदम यांनी मांडला. डायरेक्टर अॅड. चिमण डांगे यांनी स्वागत केले. सभेची नोटीस वाचन विनोद देशमुख यांनी केले, तर कामकाजाचा अहवाल अॅड. डांगे सभेत सादर केला. सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले.
माजी मंत्री डांगे म्हणाले, सध्या राज्यातील सूत व्यवसाय मोठ्या संकटातून जात आहे. कापसाला दर जास्त असून सुताला दर कमी आहे. या असमतोलामुळे सूतगिरण्या तोट्यात जात आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर बहुतांश सूतगिरण्या बंद पडतील. अनेक ठिकाणी गिरण्या थांबल्या आहेत, रोजगार बंद झाला आहे, मात्र याची कोणालाच चिंता नाही. ते पुढे म्हणाले, आपली दीनदयाळ सूतगिरणीदेखील तोट्यात आहे, मात्र सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कामगारांनी मन लावून काम केले आहे म्हणून आजही आपली गिरणी सुरू आहे. नवीन संचालक मंडळाने या संकटावर मात करून गिरणीची चाके थांबू देऊ नयेत. ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. परिस्थिती कठीण आहे, पण त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
संचालक मंडळाने कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहून गिरणी चालविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याग कौतुकास्पद आहेत. मी आणि आम्ही सर्व या गिरणीच्या मागे उभे आहोत. नवीन संचालक मंडळाने आमची मदत घ्यावी आणि गिरणीचे कामकाज सुरळीत ठेवावे. यावर्षी दीनदयाळ सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक लागल्याने सभासदांना भेटवस्तू देणे किंवा कामगारांचा सत्कार करणे शक्य झाले नाही, अशी माहिती देण्यात आली. सभासदांचा एकमताने निर्णय सभेत घेतलेले सर्व निर्णय एकमताने मंजूर झाले. यामुळे सभासद आणि संचालक मंडळ यांच्यातील विश्वास आणि एकजुटीचे दर्शन घडले. ए. के. पाटील व अजित पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सभेचे संयोजन बजरंग कदम, उमेश गावडे, आदित्य यादव, दादासाहेब पाटील, संजय कुशिरे, संतोष माने, प्रकाश दगडे, राजेंद्र मिरजे, राजेंद्र लोंढे, एस. आय. मेत्री आणि विनोद देशमुख यांनी केले. विनोद देशमुख यांनी आभार मानले.