इस्लामपूर : इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्याची मागणी प्रलंबित आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर जयंती महोत्सव समितीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोरच अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. जोपर्यंत शहरात योग्य जागेची निश्चिती होत नाही, तोपर्यंत हा पुतळा हलवला जाणार नाही, असा पवित्रा समितीने घेतला आहे.
गेली अनेक वर्षे सत्यशोधक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी पाठपुरावा करत आहे. दलित महासंघ, डीपीआय, तसेच इतर मागासवर्गीय संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारला आहे. पुतळ्यासाठी जागा देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी अण्णा भाऊंच्या जयंतीदिनीच तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कार्यकर्त्यांनी पुतळा बसवला.
दलित महासंघाचे प्रा. सुधाकर वायदंडे म्हणाले, आम्ही अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने पुतळ्याची मागणी करत आहोत. प्रत्येकवेळी फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, कृती काहीच नाही. ही प्रशासनाची उदासीनता आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पवार यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, समितीने लेखी आश्वासनाशिवाय पुतळा न हलवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉ. विजय चांदणे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, नंदकुमार नांगरे, दयानंद चव्हाण, शंकर महापुरे, प्रा. सुभाष वायदंडे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण, राम देवकुळे, कबीर चव्हाण, सदाभाऊ चांदणे, विनोद बल्लाळ आदी उपस्थित होते.