सांगली/ कोल्हापूर ः शक्तिपीठ महामार्गाविरोधात 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अंकली (ता. मिरज) येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. एक जुलै रोजी 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.
‘शक्तिपीठ’ ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे, त्या जिल्ह्यांतील नेते, लोकप्रतिनिधी, शेतकरी यांची ऑनलाईन बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग आहे. तरीसुद्धा नागपूर ते गोवा हा आणखी एक महामार्ग करण्याचे नियोजन राज्य सरकारचे आहे. या महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकर्यांचा विरोध आहे. महामार्ग करण्यात येऊ नये, यासाठी बाधित होणार्या बहुतेक शेतकर्यांनी हरकती दाखल केलेल्या आहेत. तरीसुद्धा महामार्ग करण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकर्यांचा विरोध मोडीत काढत पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाधित होणार्या सर्व 12 जिल्ह्यांमध्ये 1 जुलैरोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील रास्ता रोको हा अंकली येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.
खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात या महामार्गाला शेतकर्यांचा तीव्र विरोध असून लवकरच बाधित शेतकर्यांची बैठक घेऊन लढा उभारणार आहोत. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनीही सांगलीतील शेतकर्यांसोबत बैठक घेऊन आंदोलनात सक्रिय होण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग शेतकर्यांच्या मुळावर आला आहे. त्यामुळे बाधित सर्व जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येऊन जोरदार आंदोलन उभारणार आहेत. उपोषण व सत्याग्रहाने सरकार जागे होणार नाही, त्यासाठीच 1 जुलै रोजी महामार्ग रोको करून सरकारचे लक्ष वेधूया. या बैठकीत खासदार विशाल पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे आदी सहभागी झाले होते.