अंकलीतील मुख्य चौक बनला धोकादायक 
सांगली

Sangli News | अंकलीतील मुख्य चौक बनला धोकादायक

अपघातांचे वाढते प्रमाण; उपाययोजनांची गरज

पुढारी वृत्तसेवा
रविकांत जोशी

हरिपूर : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला अंकली चौक अपघातांचा केंद्रबिंदू बनला आहे. सिग्नल नसल्यामुळे आणि दुभाजकाची दुरवस्था झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महत्त्वाच्या चौकात स्वतंत्र वाहतूक पोलिस यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी वाहतूकदारांमधून होत आहे. या महामार्गाला लागून अनेक गावे वसलेली असून अंकली येथील चौक हा वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वेकडे सोलापूर, अंकली, धामणी, उत्तरेकडे सांगली, दक्षिणेकडे कोल्हापूर आणि पश्चिमेला हरिपूरकडे... जाणारे रस्ते येथून फुटतात. मात्र, याच चौकात प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कारण वाढत्या अपघातांमुळे हा चौक धोकादायक बनला आहे.

अंकली गावात जाणार्‍या रस्त्याच्या कडेला अनेक दुकाने थाटली आहेत. त्यातच, राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठी वाहने सर्रासपणे रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आढळतात. यामुळे चौकात मोठी वाहतूक कोंडी होते आणि वाहनांचा वेगही प्रचंड असतो. परिणामी, अंकली गावात प्रवेश करताना अनेक लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, आतापर्यंत मोठ्या 16 अपघातात पोलिस कर्मचार्‍यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे, या अत्यंत वर्दळीच्या चौकात पार्किंगची कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही. वाहतूक पोलिस केवळ वाहने थांबवून तपासणी करण्यापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियंत्रणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा देखील उपलब्ध नाही. अंकली आणि धामणी यांसारख्या गावातून येणार्‍या विद्यार्थ्यांना, तसेच जवळच एमआयडीसी असल्याने, तसेच वीटभट्ट्या असल्याने अनेक लोकांना सांगली किंवा जयसिंगपूर येथे बसमधून प्रवास करून अनेकदा येथून पायी जावे लागते. जे त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

तीन वर्षांत 16 अपघात; 5 जणांचा मृत्यू

या चौकासह रस्त्यावर 2023 ला एक अपघात झाला. यामध्ये रामराव पाटील या पोलिस अधिकार्‍याचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 10 अपघात झाले. यात दोनजणांचा मृत्यू झाला. 2025 मध्ये 5 अपघात झाले, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला.

पादचार्‍यांनी या चौकातून जायचेच नाही का?

या चौकात झेब्रा क्रॉसिंग नाही. फूटपाथ नाही. फूटपाथच्या ठिकाणी मोठमोठी अवजड वाहने आडवी लावलेली असतात. तर मग या रस्त्यावरून पादचारी कसे जाणार अथवा ते रस्ता ओलांडणार तरी कसा? का हा रस्ता पादचार्‍यांसाठी नाहीच? असा प्रश्न परिसरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या परिसरात छोटी-छोटी गावे आहेत. या गावांतील विद्यार्थी सांगली, कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज येथे शिक्षणासाठी जात असतात. ते आपला प्रवास एसटी बसने करीत असतात. या रस्त्यावर आधीच वाहने भरधाव वेगाने जात असतात. जर या विद्यार्थ्यांची बस चुकत असेल, तर त्यांनी या वाहनांना पार करून जाणे जोखमीचे ठरत आहे. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटली आहेत. या दुकानांत येणार्‍या ग्राहकांना वाहन पार्किंगची व्यवस्था करावी. मोठी अवजड वाहने रस्त्याला उभी करण्यास मनाई करावी. रस्त्यावर मधोमध वाहने लावू नयेत.
ग्रामस्थ, अंकली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT