Aniket Kothale murder case Pudhari
सांगली

Aniket Kothale murder case: सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरु नये; ॲड. प्रमोद सुतार यांचा युक्तिवाद

पुढील सुनावणी ८ जुलै रोजी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणलेला पुरावा ठोस नसेल आणि त्यामध्ये वाजवी शंका निर्माण होत असेल, तर तो ग्राह्य धरू नये व त्याचा लाभ आरोपींना द्यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांनी अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केला. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी तपासातील काही त्रुटींवर बोट ठेवत जोरदार युक्तिवाद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ जुलै रोजी होणार आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतील अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. त्यानंतर आता बचाव पक्षाचे वकील आपापल्या आरोपींची बाजू मांडत आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पडवळ यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रमोद सुतार यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कोठडीतील मृत्यूचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित मृत व्यक्ती ही पोलिसांच्या कायदेशीर ताब्यात होती, हे संशयाच्या पलीकडे सिद्ध करणे सरकार पक्षावर बंधनकारक असते. मात्र, संपूर्ण खटल्यात सरकार पक्ष हे मूलभूत तथ्यच सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांच्या निकालांचा आधार घेत त्यांनी सांगितले की, कोठडीतील मृत्यूचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मृत व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात होती, हे केवळ साक्षीदारांच्या तोंडी जबाबावरून ठरवता येणार नाही. त्यासाठी तशा लेखी नोंदी अधिकृत नोंदवहीत असणे भारतीय पुरावा कायद्यानुसार आवश्यक आहे.

मंगळवारच्या सुनावणी दरम्यान ॲड. प्रमोद सुतार यांना ॲड. मल्लिकार्जुन मठपती आणि ॲड. सीमा सुतार यांनी सहकार्य केले. या खटल्याच्या पुढील कामकाजाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT