चिंचणी/देवराष्ट्रे : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील प्रसिद्ध आणि पुरातन असणारे सागरेश्वर हे देवराष्ट्रे गावापासून जवळच असून प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह येथे आहे. तिथे विविध देवतांची मंदिरे असून त्यातील श्री सागरेश्वर मंदिराच्या आवारात डाव्या भिंतीला लागून असणार्या कुंडाजवळ दोन शिलालेख ठेवले आहेत. त्यातील एक बर्यापैकी स्पष्ट आहे. मिरज येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांनी अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या शिलालेखाचे ठसे घेतले. त्यावरून पुणे येथील इतिहास अभ्यासक अथर्व पिंगळे व अनिल दुधाने यांनी या शिलालेखाचे संपूर्ण वाचन केले.
सदर शिलालेख 12 व्या शतकातील असून अतिशय महत्त्वाची माहिती देतो. त्याची भाषा मराठी असून लिपी दाक्षिणात्य वळणाची नागरी आहे. सर्वात वर सूर्य, चंद्र, शिवपिंड आणि नांगर यांची अंकने करण्यात आली आहेत. त्याजवळ जनकू त्रिविक्रम अशी अक्षरे कोरली आहेत, तर सर्वात खाली भूमिदानाचे प्रतीक म्हणून गाय तसेच तलवार हे राजचिन्ह कोरलेले आहे. शिलालेखातील मजकुराच्या
स्वस्तिश्री सकु 1103 पलव (ना) मे
संवत्सरें राए श्री कंन्हारादेव वीजयरराज्ये
कर्हाड देसी भालवण प्रदेसचा माइं
देव दता कितीक अंन्नोदकाची व्रीती
लोपु करवी वा त्या फेडी तेयया गगाढौ बापू।
अशा पाच ओळी आहेत. राजा कान्हरदेव हा कर्हाड देशावर राज्य करत असताना भाळवणी प्रदेशातील माईदेव याने अन्नदानाच्या हेतूने काही भूमी दान केल्याचा उल्लेख त्यात आला आहे. ‘देवाला दिलेले दान जो कोणी फेडेल म्हणजेच नष्ट करेल, त्याचा बाप गाढव असेल’ असा शाप वाचन लेखाच्या शेवटी लिहिला आहे. कालोल्लेख ग्रेगरिअन् दिनदर्शिकेनुसार सन 1181 असा येतो. शिलालेखात उल्लेखिलेला कान्हरदेव हा राजा पहिल्यांदाच ज्ञात होत आहे.