Shravan Month 
सांगली

Shravan Month: आनंददायी श्रावणाचा आजपासून प्रारंभ

माती न्हाती-धुती होऊन तेजतर्रार हिरवीकंच

पुढारी वृत्तसेवा

सांगली : माती न्हाती-धुती होऊन तेजतर्रार हिरवीकंच झालेली आहे. श्रावण मासाच्या स्वागताला चराचर शृंगारलेला आहे. ओसंडून वाहणारे चैतन्याचे नव-नवीन झरे अशा निसर्गरूपातून प्रवाहित होत असतात. या निसर्गराजाच्या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर आज श्रावणाचा होतोय प्रारंभ.

निसर्गाला भरती आलेली असताना आनंदाचा, मांगल्याचा मास सुरू होतोय. सण-समारंभ-सोहळ्यांची भरगच्च मेजवानी या मासात मिळते. पावसाचं कोसळणं आणि त्याचा श्रावणातील खेळ यंदा अगोदरच सुरू झाला. ऋतुचक्रातील पावसाळा सृजनाची नवी पालवी घेऊन येतो. मनाचा हरेक कोपरा फुलू लागतो. हा फुटवा आनंदाचा असतो. माणसाने हरेक क्षण भरभरून जगला पाहिजे, असे पावसाळ्यात गळाभेट घेणारा श्रावण सांगतो. तो चित्तवृत्ती फुलवतो. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी...’ असे सांगतो आणि जगण्याच्या नव्या चिवट प्रेरणा देतो.

श्रावणातील निसर्ग फेर धरून आपल्या भोवती झिम्माड गात राहतो. तो चरा-चराला हिरवेगार तर करतोच-अगदी आतून-बाहेरून. आपलं मनही हिरवंगार होऊन फुलू लागतं. नदी-नाले-डोंगर-दरी आणि पावसाच्या सरीवर सरी आपल्याला ‘आनंदाचे डोही-आनंद तरंग’ करून सोडतात. श्रावणात पाना-फुलांची पाती लवलव करत असतात. त्यावरील दवबिंदूंना वाऱ्याच्या झोकात झोपाळ्यावर झुलवतात. त्याकडे पाहताना मनही फुलपाखरू होतं.

श्रावणाचा प्रत्येक रंग नादमय संगीत घेऊन येतो. त्याची गळाभेट भरभरून आनंद देते. या संगीताच्या नर्तननादात सचैल न्हाणं हाच असतो सांगावा-मातीला ऋतुमती करणाऱ्या श्रावणाचा. नवोन्मेषाचा, उत्साहाचा, उत्सवाच्या श्रावणाचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT