सांगली

काँग्रेस, पवारांची व्होट बँक आता उध्दव यांचीही : अमित शहा

दिनेश चोरगे

विटा; पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांच्या काँग्रेसची आणि शरद पवारांची व्होट बँक आता नकली शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचीही व्होट बँक बनली आहे. ठाकरे आता पाकिस्तानचा विरोध करणार नाहीत आणि काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्याची भाषाही करणार नाहीत, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील प्रचार सभेत केला.

भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ येथे त्यांची सभा झाली. सभेत शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकला कायद्याने बंदी आणली. 'पीएफआय'वर बंदी घातली. मी नकली शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे प्रश्न विचारतो की, महाराष्ट्राच्या जनतेला सीएए हवे की नको?, 'पीएफआय'वरील बंदी, राममंदिर उभारणी, तिहेरी तलाकवरील बंदी हे चांगले केले की वाईट केले? पण या सर्वांचे उत्तर आता ठाकरे देणार नाहीत. ठाकरे यांची आता नवीन व्होट बँक झाली आहे.

शहा म्हणाले, एका बाजूला 'व्होट फॉर जिहाद' आणि दुसर्‍या बाजूला 'व्होट फॉर विकास' आहे. एका बाजूला राहुल गांधी यांची चायनीज गॅरंटी, तर दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी यांची भारतीय गॅरंटी आहे. या दोन्हींपैकी कोणाला निवडणार आहात? संजय पाटील यांना मत म्हणजे मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीचे मत होय. भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविणे, काश्मीरसह देशाला सुरक्षित बनविण्याचे काम हे मत करणार आहे. हे मत गरिबांचे जीवन उजळून टाकेल. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या फेरीअखेर शंभराहून अधिक जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तिसर्‍या टप्प्यात 'चारसौ पार'च्या दिशेने मजबूत पावले टाकली आहेत.

शहा म्हणाले, प्रभू रामाच्या जन्मभूमीचा विषय काँग्रेसने 70 वर्षे लटकवत ठेवला. नरेंद्र मोदी यांनी मात्र पंतप्रधान पदाच्या दुसर्‍या कारकीर्दीतच श्रीरामाच्या जन्मभूमीत भव्यदिव्य राममंदिर बनविले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासोबत लोक राहणार नाहीत. काशी विश्वनाथ मंदिर, बद्रिधाम, केदारधामचा दरबार सजविण्याचे कामही नरेंद्र मोदी करत आहेत.

…हे सरकार सोनिया- मनमोहन सिंगांचे नाही

शहा म्हणाले, 2014 पूर्वी देशात दहशतवादी हल्ले होत होते. पाकिस्तान कुरापती काढत होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. भारतात आता सोनिया-मनमोहन सिंगांचे सरकार नाही, हे पाकिस्तान विसरले. त्यांनी उरी-पुलवामामध्ये भारतीय जवानांवर हल्ला केला. दहा दिवसातच भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचा सुपडासाफ केला. मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत आहे, हे जगाला दाखवून दिले.

महिलांना 33 टक्के आरक्षण

लोकसभा, विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. महिलांसाठी हे मोठे पाऊल मोदी यांनी टाकले आहे.

राहुलने कोरोनातही केले राजकारण

शहा म्हणाले, देशातील 80 कोटी गरिबांना मोफत रेशन, 12 कोटी घरांमध्ये शौचालय सुविधा, 10 कोटी घरांमध्ये उज्ज्वला गॅस सिलिंडर, 14 कोटी घरांना नळाचे पाणी, 50 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ दिला. राहुल गांधी यांनी कोरोना महामारीतही राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कोरोना सुरक्षित करण्यावर भर दिला.

सर्वात मोठा कारखाना कोणी बंद पाडला?

अमित शहा म्हणाले, आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणी बंद पाडला? शरद पवार यांनी त्याचे उत्तर द्यावे. शरद पवार हे दहा वर्षे कृषी व सहकारमंत्री होते. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस क्षेत्राने त्यांना नेहमीच जिंकून दिले. तरीही इथली साखर कारखानदारी अडचणीत का आली? महाराष्ट्रात 202 सहकारी साखर कारखाने होते. त्यापैकी 101 सुरू आहेत. 101 कारखाने बंद का पडले? 34 जिल्हा सहकारी बँकांपैकी 3 ते 4 जिल्हा बँकाच वाचल्या. उर्वरित जिल्हा सहकारी बँकांवर प्रशासक नियुक्तीची वेळ का आली? ही चूक कोणाची, असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला. मोदीजींनी सहकारी साखर कारखान्यांवरील 15 हजार कोटी रुपयांचा आयकर माफ केला. इथेनॉलबाबत चांगले धोरण स्वीकारले. मोदींजींमुळे सहकारी साखर कारखानदारीला व पर्यायी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

गांधीनगरपेक्षाही सांगलीत जादा कामे

शहा म्हणाले, टेंभू उपसा सिंचन योजना 1998 ला सुरू झाली. पण 1998 ते 2014 पर्यंत ही योजना कोणत्या अवस्थेत होती. 2014 ते 2019 या कालावधीत टेंभू योजनेवर 2100 कोटी रुपये खर्च केले. ही योजना पूर्णत्वाला गेली. 2 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आले. म्हैसाळ उपसा सिंचन योजनाही मार्गी लावली. 65 गावांतील 95 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सिंचन योजना सोलरवर चालविण्यासाठीची योजनाही खासदार संजय पाटील यांनी मंजूर करून घेतली आहे. पुणे-बंगळुरू ग्रीन फील्ड हायवेे मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील या महामार्गाचे काम 21 हजार कोटी रुपयांचे आहे. पुणे-मिरज- लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरण, रेल्वेमार्ग विद्युतीकरण, मिरज जंक्शन अद्ययावत करणे, सांगली जंक्शन अद्ययावत करणे, नवीन उड्डाण पूल, जिल्ह्यात 4 लाख कुटुंबातील 12 लाख लोकांना मोफत 5 किलो धान्य, जिल्ह्यातील 4 लाख शेतकर्‍यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये अनुदान, 9.40 लाख नागरिकांना 5 लाखांपर्यंत आरोग्य सुविधा, 17 हजार गरिबांना घरे आदी अनेक कामे खासदार संजय पाटील यांनी केली आहेत. माझा मतदारसंघ असलेल्या गांधीनगरपेक्षाही सांगली लोकसभा मतदारसंघात संजय पाटील यांनी अधिक कामे केली आहेत.

शहा म्हणाले, काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. त्या आघाडीतील एक जोकर नेता म्हणाला की, इंडिया आघाडीतील सर्व नेते आळीपाळीने पंतप्रधान बनतील. आळीपाळीने पंतप्रधान बनायला हा देश काय किराणा मालाचे दुकान आहे काय, असा सवाल शहा यांनी केला. देशात कोणतीही आपत्ती अथवा नैसर्गिक संकट आले की, राहुल गांधी देशाबाहेर पळतात. तापमान वाढले तरीही ते विदेशात जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र एक दिवसही सुटी न घेता देशसेवा करीत आहेत. दीपावलीची सुटी ते सीमेवर जवानांसोबत घालवतात. दहा वर्षांत मोदी 70 वेळा ईशान्य भारतात गेले. त्यापूर्वी 63 वर्षांत सर्व पंतप्रधान मिळून 22 वेळा ईशान्य भारतात गेले होते, अशी आठवणही शहा यांनी करून दिली.

सांगलीची जागा मोदींच्या झोळीत

केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड हे गेले सात दिवस सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत. सांगलीची जागा नरेंद्र मोदींच्या झोळीत जाणार असल्याचे त्यांनी मला इथे येण्यापूर्वीच सांगितले आहे, असे शहा यांनी भाषणात सांगितले.

दादा, बापू, अण्णा भाऊंची आठवण

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात प्रणाम केला. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, अण्णा भाऊ साठे यांचीही मन:पूर्वक आठवण काढली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय पाटील, मंत्री भागवत कराड, मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार रमेश शेंडगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, समित कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैशाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा उषा दशवंत, किरण तारळेकर, नीता केळकर, फिरोज शेख, माजी नगरसेवक अमोल बाबर, भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, अशोकराव गायकवाड, सुहास शिंदे, सचिन शिंदे, अनिल म. बाबर, शंकर मोहिते, विजय पाटील, हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT