सांगलीत लवकरच विमानतळ बनवले जाईल, असे अमित शहा यांनी सांगितले. 
सांगली

सांगलीत विमानतळ, हळद केंद्र, मोठा प्रकल्प आणणार

Maharashtra Assembly Election : अमित शहा यांची घोषणा : एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण जसेच्या तसे राहील

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीत लवकरच विमानतळ बनवले जाईल. हळद बोर्डची शाखा आणि मोठा प्रकल्प आणणार आहोत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगलीत भाजप महायुतीच्या प्रचार सभेत केली. संविधान आणि आरक्षणाला हात लावण्याची हिंमत कोणामध्येही नाही. अनुसूचित जाती (एससी), जमाती (एसटी) आणि ओबीसींचे आरक्षण जसेच्या तसे राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.

सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सांगलीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा झाली. आमदार सुधीर गाडगीळ, मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार व पालकमंत्री सुरेश खाडे, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, युवा नेते गौतम पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दिलीप सूर्यवंशी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, भाजपच्या नेत्या नीता केळकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. स्वाती शिंदे, शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील उपस्थित होते.

शहा म्हणाले, सांगलीत विमानतळ होईल. सांगलीतून दिल्ली, बेंगलोर, चेन्नई आणि मुंबईला लवकरच विमान प्रवास सुरू होईल. सांगली-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे. वंदेभारत रेल्वे सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय हळद बोर्डची शाखा सांगलीत सुरू करणार आहोत. सांगलीत लवकरच मोठा प्रकल्प आणणार आहोत.

पवार अ‍ॅण्ड कंपनीमुळे अनेक कामांना विलंब

शहा म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत राहून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही खोटे बोलण्याची सवय लागली आहे. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्ताकाळात झाली आहे. मुंबई मेट्रो, धारावी प्रकल्प, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, अटल सेतू आदी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांना शरद पवार, उध्दव ठाकरे आणि कंपनीमुळे विलंब झाला.

जातीआधाराने देश कमकुवत करण्याचा प्रयत्न..!

शहा म्हणाले, संविधान हा प्रचाराचा नव्हे, तर विश्वासाचा मुद्दा आहे. संविधानाच्या नावावर दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. राहुल गांधींच्या एका सभेत संविधानाच्या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप केले. पण संविधानाच्या पुस्तकाचे केवळ कव्हर छापलेले होते. बाकी आतमध्ये सर्व पाने कोरी होती. एकही कलम छापलेले नव्हते. हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. देशातील जनतेला धोका देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्यावर कोणीही भरोसा ठेवणार नाही. राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये जाऊन, भारतात आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य केले. संविधान आणि आरक्षणाला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही. एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण जसेच्या तसे राहील. काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. जातीच्या आधारावर समाजाची विभागणी करून देश कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी..!

शहा म्हणाले, काश्मीरला विशेषाधिकाराचे 370 वे कलम हटवल्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अखिलेश यादव यांनी ‘काऊ काऊ’ सुरू केले. जम्मू-काश्मीर विधिमंडळात काँग्रेसने 370 कलम पुन्हा आणण्याचा प्रस्ताव आणला. पण राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी, काश्मीरमधून हटवलेले 370 कलम पुन्हा येणार नाही, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.

मोदींमुळे धर्म, संस्कृतीला सन्मान

शहा म्हणाले, ‘सोनिया-मनमोहनसिंह’ यांच्या सत्ताकाळात देशात दहशतवादी हल्ले वारंवार होत होते. काश्मीरमध्ये बॉम्ब फुटत होते. 2014 मध्ये मोदी सरकार केंद्रात आले. उरी, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. पण यावेळी देशात मोदी सरकार होते. हल्ल्यानंतर दहा दिवसात पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा केला. मोदींनी देशाला सुरक्षा आणि धर्म व संस्कृतीला सन्मान देण्याचे काम केले. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न 75 वर्षे लटकवत ठेवला. मात्र मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवला. राम मंदिर उभारले आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली.

उध्दव ठाकरेंवर घणाघात

शहा यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. शहा म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व तत्त्वांना तिलांजली दिली. छत्रपती संभाजीनगर नामकरण, राम मंदिर उभारणी, 370 कलम, वक्फ कायद्यातील सुधारणेला विरोध करणार्‍यांसोबत उध्दव ठाकरे बसत आहेत.

वक्फ कायदा बदलाला पवार कंपनीचा विरोध

शहा म्हणाले, शेतकरी, मंदिर, शाळा, कॉलेजची जमीन वक्फ बोर्डाची होईल. त्यामुळे वक्फ बोर्ड कायदा बदलण्याची गरज आहे. परंतु शरद पवार आणि कंपनीचा वक्फ बोर्ड कायदा बदलण्यास विरोध आहे. कर्नाटकमध्ये गावेच्या गावे, शेतकरी, मंदिर, शाळा, कॉलेजची जमीन वक्फ बोर्डाची झाली आहे. वक्फ कायदा मोदी सरकारच बदलेल.

पवार, चव्हाण केंद्रात होते, पण..!

शहा म्हणाले, केंद्रात काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्री असताना केंद्राकडून महाराष्ट्राला 2004 ते 2014 या काळात 1 लाख 91 हजार कोटींचा निधी मिळाला. मोदी सरकारच्या 2014 ते 2024 या काळात महाराष्ट्राला केंद्राकडून 10 लाख 15 हजार 900 कोटी रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला मोदी सरकारने गती दिली आहे.

राज्यात पुन्हा महायुतीच..!

शहा म्हणाले, आमदार सुधीर गाडगीळ यांना मतदान म्हणजे प्रधानमंत्री मोदी यांचे हात बळकट होणार आहेत. किसान सन्मान योजनेतून वार्षिक 12 हजार रुपये अनुदान दिले जाते. आता ते 15 हजार रुपये करणार आहोत. आयुष्मान भारत योजनेेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आणखी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार होणार आहेत. सांगलीत 36 हजार गरिबांना घर मिळाले. आणखी 40 हजार गरीब कुटुंबांना घरासाठी अनुदान दिले जाणार आहे. पाच लाख कुटुंबांना प्रत्येक महिन्याला पाच किलो धान्य मोफत देणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास प्रत्येक खेड्यात जलसिंचनाचे जाळे निर्माण केले जाईल. प्रत्येक शेतकर्‍याच्या जमिनीला पाणी मिळेल. महाराष्ट्रातील जनतेचा नरेेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वागत केले. जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, भाजपचे युवा नेते सिद्धार्थ गाडगीळ, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, किरण भोसले आदी उपस्थित होते.

भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन अन् जल्लोष

सांगलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्यानिमित्ताने भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहा यांच्या सभेसाठी लोक गटा-गटाने येत होते. दुचाकी, चारचाकी वाहनांना भाजपचे झेंडे लावून कार्यकर्ते येत होते. शहराच्या विविध भागातून युवक, महिला रॅलीने सभास्थळी आल्या. ‘जय शिवाजी, जय भवानी, भारतमाता की जय’, अशा घोषणा देत अमित शहा यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले. उपस्थितांनाही जोरदार घोषणा द्यायला लावल्या.

पाटील, गाडगीळ, खाडे यांचा जयघोष

सभा सुरू होताच अमित शहा यांनी भाषणात माजी खासदार व तासगाव-कवठेमहांकाळचे उमेदवार संजय पाटील यांचे नाव घेताच, उपस्थितांनी जल्लोष केला. शहा यांनी संजय पाटील यांच्याबरोबरच सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनाही व्यासपीठावर समोर बोलावून जनतेसमोर अभिवादन करायला लावले, तेव्हा उपस्थितांनी जयघोष केला.

श्री गणेश, शिवरायांना वंदन, दादा-बापूंचे स्मरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणाची सुरुवात सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाला स्वराज्याचे संस्कार दिले, असे गौरवोद्गार काढले. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यासह सर्व महापुरुषांचे स्मरण त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला केले.

पवारांच्या काळात वसंतदादा कारखाना विक्रीचा प्रयत्न

सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या नावाने असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या सत्ताकाळात झाला. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेचा घोटाळा करण्याचा प्रयत्न काँग्रेसमधील व्यापारी प्रवृत्तींनी केला, अशी टीका अमित शहा यांनी केली.

सहकारी कारखान्यांची मृत्युघंटा पवारांच्या काळात

अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात 200 सहकारी साखर कारखाने होते. त्यापैकी आता 101 कारखाने राहिले आहेत. सहकारी साखर कारखान्यांची मृत्युघंटा शरद पवार यांच्या काळात वाजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांना आयकर माफी देऊन दिलासा दिला. त्यातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 15 हजार कोटी रुपये मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT