सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे निश्चितच प्रेरणा व ऊर्जा देणारे आहेत. मात्र डॉ. आंबेडकर यांना केवळ पुतळ्यात शोधण्यापेक्षा त्यांना त्यांच्या विचारात, त्यांच्या ग्रंथात शोधावे. अंधभक्त होण्यापेक्षा विचारांचे भक्त व्हावे, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिला. सांगलीत डॉ. आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे मोठ्या दिमाखात व नेत्रदीपक आतषबाजीत काल लोकार्पण झाले.
येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या नवीन भव्य पुतळ्याचे लोकार्पण समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर व माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्याहस्ते झाले. आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजय पाटील, भाजपचे नेते शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी सभापती अतुल माने, समाजकल्याण सभापती गीता पवार, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान प्रमुख उपस्थित होते.
भीमराव आंबेडकर म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहे. परदेशांमध्ये, तेथील विद्यापीठांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, प्रतिमा आहेत. युनोच्या मुख्यालयात दर्शनी भागात डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. हा भारत देशाचा, सर्व भारतीयांचा मोठा गौरव आहे. त्यांचे कार्य जगभर वाखाणले जाते.
माजी मंत्री बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित घटकांसाठी संघर्ष केला. ते एकता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचे जिवंत प्रतीक आहेत. सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनसाठी 7.50 कोटी रुपये निधीची गरज आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा महापालिका लवकरच ठराव करेल. शासन निधी उपलब्ध होईल. महापालिकाही निधी कमी पडू देणार नाही.
आभार महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मानले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेखर इनामदार यांनी वाचून दाखवला. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, जगन्नाथ ठोकळे, विष्णू माने, अभिजित भोसले, सूरज पवार, रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, सुरेश दुधगावकर, किरणराज कांबळे, प्रमोद इनामदार, सिद्धार्थ माने उपस्थित होते.