‘अलमट्टी’प्रश्नी सांगली, कोल्हापूर, सातारा बंद करू 
सांगली

‘अलमट्टी’प्रश्नी सांगली, कोल्हापूर, सातारा बंद करू

बैठकीत निर्णय, कर्नाटक सरकारचा निषेध; न्यायालयासह रस्त्यावरची लढाई लढणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध करण्यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बंदची तारीख लवकरच जाहीर करू, असे या बैठकीत सांगण्यात आले.

आमदार अरुण लाड यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपट्ट्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळेच सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत महापूर येतो, हे वेळोवेळी सिध्द झालेले आहे. आता कर्नाटक सरकार या धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवत आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील कृष्णाकाठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. आपले मरण टाळण्यासाठी आता राज्य सरकारवर फारसे अवलंबून न राहता, या तिन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्त नागरिकांनीच न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापुरात महापूर येतो, या जनभावनेशी मी सहमत आहे. मात्र दुर्दैवाची बाब ही की, महाराष्ट्र सरकार पुराव्यानिशी आतापर्यंत हे सिध्द करू शकले नाही. सरकारने अनेक एजन्सीज्, तज्ज्ञ लोक असताना, या विषयाचा सखोल अभ्यास करून याबाबतचा अहवाल केंद्र शासन, जल आयोग व लवादासमोर सादर करणे आवश्यक होते. मात्र ते झालेले नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते, काम काही करत नाही. अलमट्टी प्रश्नाबाबत सरकारवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही.

आमदार रोहित पाटील म्हणाले, महापूर जरी जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात येत असला तरी, याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणावर होतात. त्यामुळे हा केवळ नदीकाठचा विषय नाही, तर याची झळ दुष्काळी भागालाही बसणार आहे. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत विधानसभेत मी आवाज उठवेन. खासदार विशाल पाटील यांनी इतर खासदारांना बरोबर घेऊन लोकसभेत आवाज उठवावा. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकांनी एकत्रित लढा उभारणे आवश्यक आहे अलमट्टीमुळे महापुराचा धोका वाढतो, याबाबत राज्याच्या मंत्र्यांनाच माहिती नाही, याचे आश्चर्य आहे. या लढ्यात मी सोबत आहे. पण तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा, यासाठी मी जनजागृती करणार आहे.

आमदार लाड म्हणाले, 2005, 2019, 2021 चे महापूर आपण अनुभवले आहेत. प्रचंड मोठे नुकसान त्यावेळी झाले. अनेक गावांना तीन महिने पाण्याचा वेढा होता. या संकटाचे गांभीर्य सरकारसह लोकप्रतिनिधींनाही दिसत नाही. अलमट्टीची उंची वाढविण्याचा कर्नाटकचा हट्ट व यावर महाराष्ट्र शासनाची निष्क्रियता यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांवर मात्र मरण ओढवणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच न्यायालयासोबत रस्त्यावर उतरून ही लढाई लढली पाहिजे. महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, सरकारवर अवलंबून न राहता पूरग्रस्त नागरिकांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय जल आयोग, जलशक्ती मंत्रालय, पर्यावरण विभाग व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पोस्टाद्वारे जास्तीत जास्त तक्रारी कराव्यात. या तक्रारींची दखल घेणे सरकारला भाग पडेल. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे भारत पाटील, अजित सूर्यवंशी, पोपट फडतरे, उमेश जोशी, प्रल्हाद गडदे, अजित शिरगावकर, रामभाऊ थोरात, बाबासाहेब पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.

पाहुण्याच्या मदतीला आलोय ः आ. रोहित पाटील

महापुराशी संबंधित या बैठकीला दुष्काळी भागातील आ. रोहित पाटील यांची उपस्थिती सर्वांनाच आश्चर्याची होती. खा. विशाल पाटील यांनीही याबाबत विचारणा केली. आ. पाटील म्हणाले, तासगाव भागातील लोक जतकडच्या भागाऐवजी सांगली, वाळव्याकडे सोयरिक अधिक करतात. त्यामुळे आमचे या भागात अनेक पैपाहुणे आहेत. आमचे हे पाहुणे महापुरात बुडत असताना आम्ही गप्प कसे राहू? त्यामुळे पाहुण्यांच्या मदतीला आलो आहे.

उंची वाढविल्यास गावे सोडावी लागतील

बैठकीत अनेकांनी, धरणाची उंची वाढविल्यास नदीकाठावर राहणार्‍या लोकांना गावे सोडावी लागतील, याबाबत चिंता व्यक्त केली. आता लढा दिला नाही, तर पुन्हा काहीही करता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

गेले लोकप्रतिनिधी कुणीकडे?

आमदार लाड म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत काही दिवस चर्चा सुरू आहे. मात्र यावर सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली नाही. साधा निषेधही नोंदवला नाही. आजच्या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांना दिले होते, मात्र बरेचजण आले नाहीत याची खंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT