आष्टा : पुढारी वृत्तसेवा
येथील शिवाजी चौकात उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्यावतीने सांगलीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आष्टा शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्यावतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची सिटी सर्व्हे नंबर 1075 मधील 154.70 चौरस मीटर नियोजित जागा शासनाने नगरपालिकेकडे हस्तांतरीत केली आहे. पुतळ्यासाठीचा चबुतरा उभारणीसाठी नगरपरिषदेने 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. खा. धैर्यशील माने यांनी दिलेल्या 11 लाख रुपये निधीतून पुतळ्याच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्यावतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तरी या पुतळा उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, सुभाष देसाई, शिवाजी चोरमुले, विजय मोरे, प्रकाश शिंदे मिरजकर, दीपक मेथे उपस्थित होते.