कडेगाव : पुढारी वृत्तसेवा सांगली शहरापासून जवळ असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी 160 एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेवरच विमानतळच व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे.हा प्रश्न मागील 20 वर्षांपुर्वीपासून प्रलंबित आहे. शासनाने येथे विमानतळ मंजूर केले आहे. मात्र विमानसेवा सुरू करण्याबाबत शासनाकडून कोणतेही ठोस पाऊले अद्याप उचलली गेली नाहीत. तेंव्हा तातडीने राज्य शासनाने येथे विमानसेवा सुरू करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.
यावेळी बोलताना आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले, राज्यात संगलीच असा एकमात्र जिल्हा आहे जिथे विमानतळ नाही. कवलापूर विमानतळाच्या प्रस्तावाला गती न मिळाल्याने मध्यंतरीच्या काळात ती जागा हस्तांतरण करून उद्योग विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवे उद्योग सुरू करण्याबाबत वेगळा प्रयत्न झाला. मात्र जिल्ह्यातील तसेच तेथील स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतरच्या काळात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेवून या ठिकाणी विमानतळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाकडून झालेला नाही.
आधुनिक काळामध्ये कुठलाही जिल्हा विकसित करीत असताना त्या ठिकाणी विमानतळ होणे अत्यंत महत्वाचे आहे. महामार्ग, विमानतळ अशा सुविधा निर्माण झाल्यास कोणत्याही जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतो. तेथील अर्थकारणाला गती मिळते आणि शेतकऱ्यांची भरभराट होते. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब, हळद, भाजीपाला या पिकांना जगभर बाजार आहे. त्यामुळे कवलापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर शेतीमाल निर्यात करणे आपल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
जिल्हा साखर कारखानदारी तसेच उद्योग क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्यामुळे कवलापूर येथे विमान सेवा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने येथे विमान सेवा तातडीने सुरू करावी. येथे विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,रोजगार निर्मिती होईल. यामुळे याबाबत राज्य शासनाने तातडीने लक्ष घालावे कवलापूर विमानतळ सुरू करून विमानसेवा सुरू करावी अशी मागणी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.