आटपाडी : आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. या पुरस्काराने सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांनी आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात असाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अति विशिष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलचे कमांडिंग ऑफिसर आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते हे अति विशिष्ट सेवा पदक सुहास भंडारे यांना प्रदान केले जाणार आहे.
आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय, देशमुख महाविद्यालय आणि राजारामबापू हायस्कुल येथे भंडारे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. के.आय.टी.कॉलेज कोल्हापूर मधून एलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनियरिंग पदवी तर आय.आय.टी.खरगपूर येथून त्यांनी एम.टेक पूर्ण केले. या कालावधीत सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने दिलेले ज्ञान, आणि आई स्मिता भंडारे, वडील प्रभाकर भंडारे यांनी केलेले संस्कार, पत्नी प्रीती भंडारेची मर्थ साथ आणि कामाप्रती ठेवलेली श्रद्धा या शिदोरीच्या जोरावर हे अति विशिष्ठ सेवा पदक मिळाल्याचे सांगत देशासाठी योगदान देता आल्याचे समाधान वेगळेच आहे, अशी प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांनी दिली.