आटपाडी ः आटपाडी येथील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या आवारात असलेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवला. हा पुतळा नेमक्या कोणत्या जागेवर बसवला आहे, यावरून शिक्षण संस्था आणि अहिल्यादेवी होळकर पुतळा समिती यांच्यात वाद निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंकडून प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.
आटपाडी एज्युकेशन सोसायटीने पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हा पुतळा त्यांच्या मालकीच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये परवानगीशिवाय बसवण्यात आला आहे, तो तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. शैक्षणिक संकुल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा परिसर कुंपणबंद आहे. त्यामुळे पूर्वपरवानगीशिवाय पुतळा बसवणे चुकीचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देऊन आपली बाजू मांडली आहे. गट क्रमांक 4205/3 मधील 3.01 हेक्टरची जागा सरकारी ‘पडजागा’ असून, सोसायटीने त्यावर अतिक्रमण करून संरक्षण भिंत बांधल्याचा आरोप समितीने केला आहे.
यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रासपाचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, भाजप युवा नेते उमाजी चव्हाण, रासपाचे शुभम हाके, आणि विशाल सरगर यांनी सातबारा उतारा सादर केला. या दाखल्यानुसार, गट क्रमांक 4205 मधील 0.36 हेक्टर जागा पंचायत समिती बांधकाम विभागाच्या मालकीची आहे, तर 3.69 हेक्टर जागा सोसायटीच्या नावावर आहे आणि 3.01 हेक्टर जागा सरकारी पडजागा म्हणून नोंद आहे. समितीने दावा केला आहे की, या सर्व जागेवर सध्या सोसायटीचा ताबा आहे. पुतळा कोणी बसवला हे माहीत नसले, तरी पुतळ्याभोवती असलेल्या बेकायदेशीर कुंपणामुळे नागरिकांना पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता खुला करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
या घटनेमुळे आटपाडी शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, दादासाहेब हुबाले आणि रासपाचे लक्ष्मण सरगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुतळ्याला अभिवादन केले. आता या पुतळ्याच्या जागेबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.