Rohit Patil | कृषिमंत्री कोकाटे धारेवर : आमदार रोहित पाटील आक्रमक  File Photo
सांगली

Rohit Patil | कृषिमंत्री कोकाटे धारेवर : आमदार रोहित पाटील आक्रमक

विमा कंपन्यांची मनमानी

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : द्राक्ष बागायती क्षेत्रांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरले.

पाटील म्हणाले, यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवामानातील अनपेक्षित अशा बदलाने राज्यातील द्राक्षशेती अडचणीत आली आहे. पुढील द्राक्ष हंगामावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या उत्तरावर आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी आक्षेप घेतला. मांडलेल्या लक्षवेधीतील प्रश्नावर कृषिमंत्री चुकीचे उत्तर देत असल्याचे म्हणत, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या आक्रमक भूमिकेमुळे कृषिमंत्री निरुत्तर झाले.पाटील म्हणाले, द्राक्षपिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई येत असताना कृषी विभागाकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळत नाही. नुकसानग्रस्त द्राक्ष पिकाच्या अभ्यासासाठी शासनाने कृषितज्ज्ञांची समिती स्थापन करा. विमा कंपन्या वेळेवर नुकसान भरपाई देत नाहीत. विम्यासाठी आकारली जाणारी एकरी रक्कमही शेतकर्‍यांना परवडत नाही. त्यामुळे द्राक्षपीक विम्याचा कालावधी 1 वर्ष करावा, भरपाईवेळी पावसाच्या पर्जन्याच्या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी केली. कृषिमंत्र्यांनी, या मुद्द्यावर लवकरच उच्चस्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

चिनी बेदाण्याची आवक रोखावी

नेपाळमार्गे भारतात येणार्‍या बोगस चिनी बेदाण्यांमुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होत असल्याचे रोहित पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी देखील पाटील यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य असल्याचे नमूद करत कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

द्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण आखण्याची मागणी

रोहित पाटील म्हणाले, द्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण तयार करा. काही वर्षातील हवामानातील अनपेक्षित बदलामुळे द्राक्षशेती तोट्यात आहे. दिवसेंदिवस द्राक्ष शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर भविष्यात ‘द्राक्षे’च दिसेनाशी होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT