महापूर Pudhari File Photo
सांगली

महापूर आल्यास प्रशासन जबाबदार

कृष्णा महापूर कृती समिती : सांगली,कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर कारवाईची नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि त्या शेजारचा हिप्परगी बंधारा यामध्ये नियमबाह्य पद्धतीने पाण्याचा साठा केला जात आहे. त्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. सांगली व कोल्हापूर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता विभागाचेही पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत महापुराचे संकट आले तर त्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासन आणि जलसंपदा विभागांची राहील, असा इशारा समितीचे विजयकुमार दिवाण, सर्जेराव पाटील, संजय कोरे, संजय नलवडे, सुयोग हावळ यांनी दिला आहे.

ते म्हणाले, कोल्हापूर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय यांना ही नोटीस देण्यात आली आहे. कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश या संघटनांच्यावतीने अ‍ॅड. ओंकार वांगीकर यांनी ही नोटीस दिली आहे. जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभागाला महापुराच्या संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अशा पद्धतीची कायदेशीर नोटीस कदाचित प्रथमच दिली गेली असावी.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांच्या वतीने जिल्हा प्रशासन तसेच दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रे, सूचना पत्रे, इशारा पत्रे दिली आहेत. शिष्टमंडळे भेटूनही प्रत्यक्ष चर्चा केली आहे. महापुराच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी महापूर परिषदा आणि जनआंदोलनेही झाली आहेत. मात्र कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी येथील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणीसाठा नियमबाह्यरित्या वाढतच आहे.

पावसाचे प्रमाण यापुढे वाढत जाणार आहे. साहजिकच कृष्णा खोर्‍यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे महापुराचे भयंकर संकट सांगली व कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या दारासमोर येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना स्पष्टपणे निर्देश दिले होते की, कर्नाटकातील जलसंपदा विभागाबरोबर व प्रशासनाबरोबर समन्वय ठेवा. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही याकडे बारकाईने देखरेख करा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरा. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन तसेच कार्यकारी अभियंते यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असे स्पष्ट दिसत आहे.

अलमट्टी धरणातील पाणी पातळी 31 जुलै अखेर 513.60 मीटर आणि 31 ऑगस्टपर्यंत 517 मीटर असली पाहिजे, असा केंद्रीय जल आयोगाचा निर्देश आहे. प्रत्यक्षात आजच (13 जुलै 2024) अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.34 मीटर आहे. धरणामध्ये 19 हजार 919 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. विसर्ग मात्र फक्त 3 हजार 500 क्युसेक आहे. अलमट्टी धरणामध्ये आजचा (13 जुलै) 88.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच धरण जवळजवळ 60 ते 65 टक्के आत्ताच भरले आहे. हिप्परगी बंधार्‍याचीही तशीच परिस्थिती आहे. त्या बंधार्‍याचीही सर्व दारे अद्याप मोकळी केलेली नाहीत.

तातडीने हालचालींची गरज

कृष्णा खोर्‍यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. त्यामुळे 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्हा प्रशासनाने व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT