सांगली : महानगरपालिका क्षेत्रात संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कृष्णा नदीपात्र व सरकारी घाटावर एनडीआरएफ, अग्निशमन व आणीबाणी सेवा दलाकडून बचावकार्य व बोटींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
पूरस्थितीत मदतीसाठी वापरण्यात येणार्या बोटी, जीवनरक्षक उपाययोजना, तसेच बुडणार्यांना वाचवण्याच्या कृती यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. एनडीआरएफचे प्रमुख संतोषकुमार तिवारी यांच्या नेतृत्वाखाली 24 जवान, तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील माळी व 31 जवानांच्या टीमने पूरस्थितीत वापरल्या जाणार्या यंत्रणेचे सादरीकरण केले. महापालिकेच्या 7 बोटी व आवश्यक उपकरणे यावेळी सज्ज ठेवली होती. प्रात्यक्षिकानंतर आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत लागणारे साहित्य व उपकरणांचे प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी यांनी याची पाहणी केली. नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घ्यावी, प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त विजया यादव, अप्पर तहसीलदार अश्विनी वरूटे-आडसूळ, मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, सहायक आयुक्त नुकल जकाते, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत पूर्वतयारी केली आहे. महापूर उद्भवल्यास त्याची दाहकता कमी करण्यासाठी ही तयारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहराबरोबरच मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यांवर विशेष फोकस राहणार आहे. मानवी जीवन सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांना कमीत कमी त्रास व्हावा, त्यांचे जीवन सुरक्षित राहावे, यासाठी एनडीआरएफ पथकामार्फत प्रशिक्षणही दिले जात आहे. नागरिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.अशोक काकडे, जिल्हाधिकारी