Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli News: गट नोंदणी करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष, माजी आ. विलासराव जगताप यांचा आरोप : मुंबईतील बैठकीकडे नेत्यांनी फि रवली पाठ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. निवडीबाबतची नोंदणी करण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, त्यामुळे ते टाळाटाळ करीत असावेत, अशी शंका आहे, असा आरोप राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी केला.

जगताप म्हणाले, दोन दिवसांपूर्वी गटनेतेपदाची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व सदस्य आणि इतर पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र प्रशासनाकडून तांत्रिक चूक काढण्यात आली. सांगितलेली चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने शुक्रवारी अर्ज सादर करण्यात आला. मात्र पुन्हा त्यामध्ये चूक काढण्यात आली. सर्व सदस्य, पदाधिकारी दिवसभर ताटकळत बसले होते, मात्र गट स्थापन न करताच जिल्हाधिकारी निघून गेले. याचा आम्ही निषेध करतो.

कोणाच्या तरी दबावाखाली काम न करता कायद्याच्या चौकटीत जे बसते त्याचे पालन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे. ते म्हणाले, प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्यानेच गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात नाही. हे योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायाची भूमिका घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात व्हीपच्या अधिकारावरून दोन दिवसांपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणे आवश्यक आहे, मात्र जिल्हाध्यक्षांनी व्हीपचे अधिकार स्वत:कडे घेतल्याचे आरोप झाले. नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर व्हीपच्या अधिकाराबाबतचे पत्र पुन्हा नव्याने देण्यात आले. मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पुन्हा गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची शुक्रवार, दि. 6 रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील नेते चर्चा करणार होते. मात्र या बैठकीकडे जिल्ह्यातील नेत्यांनी पाठ फिरवली. कोणीही या बैठकीला गेले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून महायुतीसोबत जाण्यासाठी दबाव असल्याचे बोलले जात आहे.

मात्र जिल्ह्यातील बहुतांश नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत. आमचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळे कोणाच्या दबावाखाली निर्णय घेणार नाही. कोणासोबत जायचे हे आम्ही जिल्ह्यातील नेते ठरवू, अशी भूमिका जिल्ह्यातील काही नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचे समीकरण आता नवीन वळण घेणार, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT